खुल्या रंगमंचावरील तमाशाला द्या परवानगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:32 IST2021-01-08T04:32:34+5:302021-01-08T04:32:34+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : राज्यात सुमारे दीडशे तमाशा फडाच्या माध्यमातून साडेचार हजार कलावंत पोट भरतात. कोरोनामुळे गावजत्रेतील तमाशा ...

खुल्या रंगमंचावरील तमाशाला द्या परवानगी
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : राज्यात सुमारे दीडशे तमाशा फडाच्या माध्यमातून साडेचार हजार कलावंत पोट भरतात. कोरोनामुळे गावजत्रेतील तमाशा कार्यक्रम झाले नाहीत. त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे खुल्या मंचावरील तमाशाला सरकारने परवानगी द्यावी, अशी मागणी लोकनाट्य तमाशा फडमालक व कलावंत विकास संघाच्या कार्याध्यक्ष मंगला बनसोडे यांनी केली.
सरकारने या मागणीची दखल न घेतल्यास येत्या ८ जानेवारीला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाला बसण्याचा इशारा तमाशा संघाने दिला. तमाशा संघाच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी (दि. ४) पुण्यात पत्रकार परिषद घेऊन ही मागणी केली. बनसोडे यांच्यासह अध्यक्ष रघुवीर खेडकर, सचिव मुसा इनामदार, परिवर्तन कला महासंघ पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अमर पुणेकर आदी या वेळी उपस्थित होते.
बनसोडे म्हणाल्या की, कलावंतांच्या उपजीविकेवर २० ते २५ हजार कुटुंबे अवलंबून आहेत. ते नाट्यगृहात कार्यक्रम करू शकत नाहीत. दरवर्षी पुणे, सातारा, नगर, बीड अशा जिल्ह्यांतील गावजत्रेत हे तमाशा कार्यक्रम होतात. त्यामुळे गावजत्रेला परवानगी मिळावी अशी आमची राज्य शासनाला विनंती आहे.
खेडकर म्हणाले की, सरकारने सप्टेंबर महिन्यात १८ कोटींचे पॅकेज मंजूर करून अर्थखात्याकडे पाठवले होते. परंतु अद्याप अर्थखात्याने या पॅकेजला मंजुरी दिली नाही. सांस्कृतिक कार्यक्रमांना परवानगी देण्यात आली आहे. पण त्यांनी काढलेल्या ‘जीआर’मध्ये तमाशा फड कार्यक्रम असा उल्लेखही केला नाही. लहान फडात ३५ ते ४० तर मोठ्या फडामध्ये १५० माणसे असतात. पडद्यामागचे कलाकार धरून ही संख्या ९ हजारच्या आसपास जाते. जत्रेच्या काळात एक फड २०० ते २५० कार्यक्रम घेतो. कुठलेही आमदार, खासदार आणि राजकीय नेते आमची दखल घेत नाहीत, असेही त्यांनी या वेळी सांगितले.