क्रिकेटच्या मैदानावर आघाडी विरुद्ध युती!
By Admin | Updated: January 14, 2017 03:24 IST2017-01-14T03:24:09+5:302017-01-14T03:24:09+5:30
जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत अद्याप आघाडी, युतीबाबात कोणतेही संकेत नाहीत. मात्र, क्रिकेटच्या सामन्यासाठी

क्रिकेटच्या मैदानावर आघाडी विरुद्ध युती!
कोरेगाव भीमा : जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत अद्याप आघाडी, युतीबाबात कोणतेही संकेत नाहीत. मात्र, क्रिकेटच्या सामन्यासाठी तरी ती झाली आहे. निवडणुकीपूर्वीची रंगीत तालीम ‘पीटीपीएल २०१७’ या स्पर्धेत शनिवारी पाहावयास मिळणार आहे.
राष्ट्रवादी-काँगेस पदाधिकारी विरुद्ध शिवसेना-भाजप पदाधिकरी यांच्यात हा सामना रंगणार असल्याने कोण कोणाची विकेट काढतोय की कोण कोणाचा धुव्वा उडवतोय, हे या सामन्याच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे.
जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक २१ फेब्रुवारीला होणार असून त्याच दिवशी पुणे महापालिकेचीही निवडणूक असणार असल्याने राष्ट्रवादी-काँगेस, शिवसेना-भाजप व इतर पक्षांच्या नेत्यांना निवडणुकीच्या प्रचार सभा घेण्याची मोठी कसरत करावी
लागणार आहे.
पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रदीप कंद व शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख पै. संदीप भोंडवे यांनी आयोजित केलेल्या खांदवेनगर लोहगाव येथील छत्रपती शिवाजी स्टेडियमवर पार पडणाऱ्या ‘पीटीपीएल २०१७’ या पुणे जिल्हा टेनिस बॉल क्रिकेट प्रिमीयर लीग स्पर्धेच्या अंतिम सामन्याआधी राष्ट्रवादी-काँगेस मित्रपक्ष व शिवसेना-भाजप मित्रपक्षांमध्ये राजकीय आखाड्याची रंगीत तालीम म्हणून मैत्रीपूर्ण लढत पाहायला मिळणार आहे.
राष्ट्रवादी-काँग्रेस, मित्रपक्ष व शिवसेना-भाजपा मित्रपक्षांमध्ये होणाऱ्या या सामन्यात शिवसेना-भाजपा संघात आमदार महेश लांडगे, जगदीश मुळीक, राहुल कुल, विनायक निम्हण, जिल्हा परिषदेचे
बांधकाम सभापती मंगलदास बांदल, कुलदीप कोंडे, राम गावडे, सुनील टिंगरे, राजेंद्र पायगुडे, प्रीतम खांदवे, सतीश पाबळे, महेश शिंदे, सचिन पलांडे, सचिन शितोळे तर राष्ट्रवादी-काँग्रेस संघात जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रदीप कंद, उपाध्यक्ष शुक्राचार्य वांजळे, योगेश जगताप, बाबा कंधारे, रोहित टिळक, प्रवीण माने, मानसिंग पाचुंदकर, महेंद्र पठारे, सुनील शितोळे, सुनील वागस्कर, संतोष कुंजीर, रवींद्र कंद, मोहन तापकीर, यशवंत पाचंगे आदींचा समावेश असल्याचे पै. संदीप भोंडवे यांनी सांगितले. (वार्ताहर)