भ्रष्टाचाराचा आरोप झाल्याने लसीकरण अधिकाऱ्याची तडकाफडकी बदली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2021 04:11 IST2021-04-14T04:11:10+5:302021-04-14T04:11:10+5:30
पुणे : खासगी रुग्णालयांना लस उपलब्ध करून देण्यासाठी पैसे घेतल्याच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर डॉ. अमित शहा यांची महापालिका आयुक्त विक्रम ...

भ्रष्टाचाराचा आरोप झाल्याने लसीकरण अधिकाऱ्याची तडकाफडकी बदली
पुणे : खासगी रुग्णालयांना लस उपलब्ध करून देण्यासाठी पैसे घेतल्याच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर डॉ. अमित शहा यांची महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी सोमवारी रात्री तडकाफडकी बदली केली आहे. त्यांच्या जागी आता आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकारी डॉ. सूर्यकांत देवकर यांची लसीकरण अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.
महापालिका अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत. डॉ.अमित शहा यांच्याकडे पुणे मनपाच्या कोविड व्हॅक्सिनेशन वितरणाची जबाबदारी होती. डॉ. शहा प्रत्येक रुग्णालयाकडून व्हॅक्सिन पुरवठा करण्यासाठी पैशाची मागणी करतात अशी तक्रार माजी महापौर प्रशांत जगताप यांनी केली होती. याबाबत त्यांनी आरोग्य प्रमुख महापालिका आयुक्तांकडेही तक्रारदिली होती.
डॉ. शहा यांची केवळ बदली करून हे प्रकरण दाबले जाऊ नये. आणखी काही अधिकारी यामध्ये सामील असण्याची शक्यता आहे. त्यांचे त्वरित निलंबन करून त्यांची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी जगताप यांनी केली आहे.