पुणे: पुण्यातील वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणाने राज्यभर खळबळ उडाली आहे. सासरच्या छळाला कंटाळून या विवाहितेने टोकाचे पाऊल उचलले. या घटनेनंतर आता वैष्णवीच्या सासरच्या संपूर्ण कुटुंबाला अटक करण्यात आली आहे. वैष्णवीच्या सासू, पती आणि नणंद यांना यापूर्वीच अटक करण्यात आली होती. मुख्य आरोपींपैकी असलेल्या फरार सासऱ्याला राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे यांना अखेर सातव्या दिवशी पिंपरी चिंचवड पोलिसांनी अटक केली आहे. या दोघांना आज (गुरुवार) पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास एक सापळा रचून ताब्यात घेण्यात आलं. यावरून आता हगवणे यांची मोठी सून मयुरी जगताप यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
वैष्णवीला त्रास दिलेल्या सगळ्यांना जन्मठेपेची शिक्षा व्हावी अशी मागणी मयुरी जगताप यांनी केली आहे. त्या म्हणाल्या, पोलिसांनी राजेंद्र हगवणेला अटक केली आहे. पोलीस तपास करून योग्य ती कारवाई करतील. अनेक लोक त्यांना साथ देत होती. असं वाटत असल्याने आतापर्यंत अटक झाली नाही. या प्रकरणामध्ये माझ्या नवऱ्याला विनाकारण गोवलं जात आहे. पोलिसांनी त्यांना देखील अटक केली आहे. ज्यांनी ज्यांनी वैष्णवीला त्रास दिला त्या सगळ्यांना जन्मठेपेची शिक्षा व्हावी. माझ्या पतींनी आधीच फरार न होता समोर येऊन सांगायला हवं होतं. म्हणजे त्यांना अटक केलं नसतं. आणि मुख्य सूत्रधार समोर आले असते. मी गुन्हा दाखल केल्यानंतर त्यांच्यावर कारवाई झाली असती तर वैष्णवी सोबत असं घडलं नसतं.
मयुरी जगताप यांचे गंभीर आरोप
हगवणे कुटुंबातील सासरे, नणंद यांच्याबाबत मयुरी जगताप यांनी गंभीर आरोप केले आहेत. या सगळ्या प्रकरणाला खरी कारणीभूत नणंद असल्याचे त्यांनी सांगितले आहे. तिने माझ्या चारित्र्यावरही संशय घेतला होता. तर सासऱ्यांकडून मला मारहाणही झाली होती असं त्या म्हणाल्या आहेत. माझे पती माझ्या पाठीशी होते. त्यामुळे आम्ही जास्त काळ त्यांच्यासोबत राहिलो नाही. आम्ही वेगळं राहण्यास सुरुवात केली. म्हणून आम्ही वाचलो असल्याची आपबीती मयुरी यांनी सांगितली आहे. माझ्या तक्रारीची दखल पोलिसांनी घेतली असती तर आज वैष्णवी वाचली असती.