पुण्याचे सर्व सिग्नल्स होणार ‘स्मार्ट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2016 04:49 IST2016-05-25T04:49:50+5:302016-05-25T04:49:50+5:30

बंदच पडलाय, नुसताच चालू-बंद होतोय, रंग उडालाय, एकच रंग दाखवतोय..., पुण्यातील सिग्नल्सच्या अशा तक्रारी यापुढे करता येणार नाहीत. पुण्याच्या सर्व रस्त्यांवरील सिग्नल्स

All the signals of Pune will be 'smart' | पुण्याचे सर्व सिग्नल्स होणार ‘स्मार्ट’

पुण्याचे सर्व सिग्नल्स होणार ‘स्मार्ट’

पुणे : बंदच पडलाय, नुसताच चालू-बंद होतोय, रंग उडालाय, एकच रंग दाखवतोय..., पुण्यातील सिग्नल्सच्या अशा तक्रारी यापुढे करता येणार नाहीत. पुण्याच्या सर्व रस्त्यांवरील सिग्नल्स आता स्मार्ट होत आहेत. ते वाहनांच्या संख्येनुसार स्वत:च्या वेळेत बदल करतील, नियंत्रण कक्षाबरोबर स्वत:च सतत संवाद साधतील, वीज खंडित झाली तर सौरऊर्जेवर आपोआप सुरू होतील.
स्मार्ट सिटीअतंर्गत महापालिकेने स्थापन केलेल्या पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचा हा बहुधा पहिलाच उपक्रम ठरेल. त्याची प्राथमिक तयारी पूर्ण झाली आहे. काही प्रशासकीय पूर्ततेनंतर या कामाच्या निविदाच जाहीर होतील. एकूण ३४० सिग्नल्सचा यात समावेश करण्यात आला आहे. वाहनांची गर्दी असलेल्या मोठ्या रस्त्यांपासून ते बसवण्यास सुरुवात होईल. त्यातील काही सिग्नल्स पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीतही आहेत.
महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी ही माहिती दिली. नव्या तंत्रज्ञानानेयुक्त असे हे सिग्नल्स असतील. या सिग्नल्सचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे ते वाहनांच्या संख्येनुसार स्वत:ची वेळ अ‍ॅडजस्ट करतात. त्यासाठी त्यांना सेन्सर बसवण्यात आले आहेत. एरवीच्या सिग्नल्सना विशिष्ट टायमिंग दिलेले असते. वाहनांची संख्या वाढली किंवा कमी झाली तरीही ते तेवढा वेळ सुरूच असतात. त्यामुळे वाहनांची गर्दी नसली तरी लाल दिवा असेल तर वाहनांना तेवढा वेळ थांबावेच लागते. त्यात वेळ व इंधनही वाया जाते. वाहतूकही खोळंबून राहते.
याशिवाय हे सिग्नल्स त्यांच्यासमोरच्या चारी रस्त्यांवरच्या वाहनांच्या संख्येची माहिती सतत नियंत्रण केंद्राला पाठवत राहतील. त्यावरून त्यात्या रस्त्यावरील वाहतुकीचे विश्लेषण करणे वाहतूक शाखेला शक्य होणार आहे. हे सिग्नल्सही विजेवरच चालतात, मात्र वीजपुरवठा खंडित झाला तर ते आपोआप सौरऊर्जेवर सुरू होतील, अशी व्यवस्था त्यात आहे. (प्रतिनिधी)

कोंडी फुटण्यास होणार मदत
गर्दीच्या वेळी या सिग्नलमुळे कोंडी फुटण्यास मदत होणार आहे. तसेच कोंडी जास्त वेळ राहणार नाही.

कोणत्या वेळेस किती वाहने असतात, गर्दीची वेळ कधी, गर्दी नसणारी वेळ कोणती, वाहने किती वेळ थांबून असतात, अशी सर्व माहिती नियंत्रण कक्षाला सतत मिळत राहील.

नवे सिग्नल्स वाहनांच्या संख्येनुसार वेळ अ‍ॅडजस्ट करणारे आहेत. म्हणजे गर्दीची वेळ असेल तिथे लाल रंगाचा दिवा जास्त वेळ असेल. गर्दीची वेळ नसेल तेव्हा त्याची वेळ आपोआप कमी होईल.

पिवळा व हिरवा दिवाही याचप्रकारे वेळ अ‍ॅडजस्ट करेल. यामुळे वाहने चौकांमध्ये थांबून राहण्याचे प्रमाण कमी होणार आहे. वाहतूक सतत प्रवाही राहण्यास मदत होणार आहे.

नवीन सिग्नलची वैशिष्ट्ये
ते वाहनांच्या संख्येनुसार स्वत:च्या वेळेत बदल करतील. जास्त वाहने असतील तिकडे जास्त वेळ देतील.

नियंत्रण कक्षाबरोबर स्वत:चा सतत संवाद साधतील. नियंत्रण कक्षातील अधिकारी उपाययोजना करतील.

वीज खंडित झाली तर सौरऊर्जेवर आपोआप सुरू होतील. या सिग्नलला विजेची गरज लागणार नाही.

पुणे बदलत आहे या नव्या सिग्नल्समधून लक्षात येईल. वाहतूक शाखेची या सिग्नल्ससाठी परवानगी मिळाली आहे. हैदराबाद येथे असे सिग्नल्स सुरू असून तिथे वाहतूक नियंत्रणासाठी त्याचा चांगला उपयोग झाला आहे.
- कुणाल कुमार, आयुक्त, महापालिका

Web Title: All the signals of Pune will be 'smart'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.