सर्वपक्षीय सत्कार ही पुण्याची संस्कृती
By Admin | Updated: January 19, 2015 00:14 IST2015-01-19T00:14:30+5:302015-01-19T00:14:30+5:30
राजकारणात अनेक शत्रू निर्माण होत असताना सर्वपक्षीयांनी एकत्र येऊन सत्कार करणे हे मोलाचे उदाहरण आहे. गिरीश बापट यांनी राजकारणाच्या पलीकडे जाऊन सर्व पक्षांत मित्र जोडले.

सर्वपक्षीय सत्कार ही पुण्याची संस्कृती
पुणे : राजकारणात अनेक शत्रू निर्माण होत असताना सर्वपक्षीयांनी एकत्र येऊन सत्कार करणे हे मोलाचे उदाहरण आहे. गिरीश बापट यांनी राजकारणाच्या पलीकडे जाऊन सर्व पक्षांत मित्र जोडले. पुण्याची ही राजकीय संस्कृती आहे, असे मत भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केले.
पुण्याच्या राजकारणात ‘भाऊ’ म्हणून परिचित असलेले पालकंमत्री गिरीश बापट यांचा रविवारी सर्वपक्षीय सत्कार बालगंधर्व रंगमंदिरात झाला. या वेळी दानवे बोलत होते. सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील, महापौर दत्तात्रय धनकवडे, परिवहनमंत्री दिवाकर रावते, खासदार वंदना चव्हाण, माजी आमदार उल्हास पवार, बाळा नांदगावकर, राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर, माजी मंत्री शशिकांत सुतार, रिपब्लिकन पक्षाचे शहराध्यक्ष महेंद्र कांबळे, बापट यांच्या सौभाग्यवती गिरिजा आणि पुत्र गौरव आदी व्यासपीठावर होते.
दानवे म्हणाले, ‘‘ सर्वांना सोबत घेऊन चालणारा हा ‘भाऊ’ आहे. पक्षविरहित मैत्री त्यांनी जपली. राजकारणात अनेक शत्रू निर्माण होत असतात. अशा वेळी सर्व पक्षांच्या नेत्या-कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन सत्कार करणे अत्यंत मोलाचे आहे. गिरीश बापट आणि मी भारतीय जनता पक्षाचे संस्थापक-सदस्य आहोत. ’’
पाटील म्हणाले, ‘‘ गिरीश बापट म्हणजे डोक्यावर बर्फ, तोंडात साखर. जाती धर्मापलीकडे, आपले वाटणारे बापट सर्वांना आपला भाऊ असावा, असे आहेत. राजकारणात मतभिन्नता असताना त्यांच्या सत्काराच्या कार्यक्रमात मतैक्य असणे हे अपूर्व आहे. ’’
रावते म्हणाले, ‘‘ बापट यांनी प्रामाणिकपणाचे पावित्र्य राजकारणात सांभाळले. पक्षासाठी कडवट असले, तरी सर्वपक्षीयांशी त्यांची मैत्री आहे. सरकारचे कान उपटणारा, झिंज्या धरणारा आमदारच विधानसभेत असावा, असा बाळासाहेब ठाकरे यांचा बापट यांना आशीर्वाद होता.’’
पवार म्हणाले, ‘‘सामाजिक प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर बापट यांचा सर्वपक्षीय सत्कार ही मोठी बाब आहे. ’’
नांदगावकर म्हणाले, ‘‘राजकारणात डागाळलेली माणसे खूप असताना बापट निष्कलंक, चारित्र्यवान आहेत. अजातशत्रू मित्राचा नागरी सत्कार ही अत्यंत आनंदाची बाब आहे. त्यांच्या पक्षावर टीका केली, तरी त्यांनी आमच्याविषयी कटुता बाळगली नाही. ’’
सत्काराला उत्तर देताना बापट म्हणाले, ‘‘वेगवेगळ्या पक्षांमधील कार्यकर्त्यांची मने कलुषित होतात. एखाद्या वेळी त्याचे रूपांतर खुनात होते. राजकीय अस्पृश्यता संपायला हवी. सर्वांना सोबत घेऊन जाण्याची पद्धत राजकारणातही यायला हवी. मला मित्र जमविण्याचे वेड आहे. मित्रांचे ऋण आयुष्यात विसरू शकत नाही. समोरचा जरी चांगला वागला नाही, तरी आपण त्याच्याशी चांगले वागायचे, हे माझे तत्त्व आहे. मंत्री झालो तरी मी सामान्य माणसासारखाच राहणार. ’’
महापौर, वंदना चव्हाण यांचीही भाषणे झाली. सूर्यकांत पाठक यांनी मानपत्राचे वाचन केले. अशोक येनपुरे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)