सर्व पक्ष स्वबळावर
By Admin | Updated: February 4, 2017 03:57 IST2017-02-04T03:57:57+5:302017-02-04T03:57:57+5:30
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीमध्ये आघाडी होण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र, काँग्रेसने जिल्हा परिषद गटासाठीची ७५पैकी १५ जागांची पहिली

सर्व पक्ष स्वबळावर
पुणे : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीमध्ये आघाडी होण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र, काँग्रेसने जिल्हा परिषद गटासाठीची ७५पैकी १५ जागांची पहिली यादी जाहीर केल्यानंतर मात्र जिल्ह्यात काँग्रेससह सर्व प्रमुख पक्ष स्वबळावर लढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
जिल्हा परिषद निवडणुकीचा रणसंग्राम सुरू झाला आहे. अर्ज भरण्यास बुधवारपासून (दि. १) सुरुवात झाली आहे. गुरुवारपर्यंत कोणत्याही पक्षाने आपली उमेदवार यादी जाहीर केली नव्हती. बंडखोरी होण्याची शक्यता पाहता सर्वच पक्ष ‘पहिले आप, पहिले आप’ करत यादी जाहीर करत नव्हते. भाजपाचे जिल्हाध्यक्ष बाळा भेगडे यांनीही १ फेब्रुवारीला यादी जाहीर करणार असल्याचे सांगितले होते. मात्र त्यांनीही यादी जाहीर केली नाही. सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुलाखतींना आलेल्या इच्छुकांची संख्या बघता आधीच यादी जाहीर केली तर बंडखोरी होण्याची मोठी शक्यता आहे, त्यामुळे त्यांनीही ‘वेट अँड वॉच’चे धोरण ठेवले असून, ६ फेब्रुवारीपर्यंत यादी जाहीर करणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
शुक़्रवारी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय जगताप, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी मात्र पत्रकार परिषद घेत आपली जिल्हा परिषद गटासाठीची १५ उमेदवारांची यादी जाहीर केली. निवडणुका स्वबळावर लढणार असल्याचे जगताप यांनी स्पष्ट केले.
या यादीत वेल्हे तालुक्यातील कुरण खुर्द विंझर या सर्वसाधारण गटातून काँग्रेसच्या विद्यमान सदस्या वसुधा नलावडे यांचे पती अमोल नलावडे यांना तर भोर तालुक्यातील कारी उत्रौली या सर्वसाधारण
गटातून विद्यमान सदस्या गीतांजली आंबवले यांचे पती आनंद आंबवले यांना उमेदवारी मिळाली असून,
त्यांनी आपला उमेदवारी अर्जही भरला आहे. तसेच पुरंदरचे पंचायत
समिती सदस्य दत्तात्रय झुरूंगे
यांना बेलसर-माळशिरस या नागरिकांच्या मागास प्रवर्ग गटासाठी उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)
तिसरी आघाडीही अधांतरी
राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेला बारामती काबीज करण्यासाठी भाजपाने विशेष लक्ष केंद्रित केले. परंतु, शिवसेना-भाजपाची युती संपुष्टात आली. त्यानंतर रासप, स्वाभिमानी शेतकरी हे एकत्रीत येऊन तिसरी आघाडी करून राष्ट्रवादीविरोधात निवडणूक लढण्याची रणनीती आखत होते. मात्र अद्याप याबाबत एकमत झाल्याचे दिसत नाही.
दौंड तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टी व राष्ट्रीय समाज पक्ष
यांची युती झाल्याचे समजते. रासपला कमळाच्या
चिन्हावर निवडणूक लढवावी लागणार असल्याचे खात्रीलायक वृत्त असून, शुक्रवारीही याबाबत बैठक घेण्यात आली.