सर्वच पक्ष प्रभावी असल्याने बहुरंगी लढत

By Admin | Updated: November 16, 2016 03:28 IST2016-11-16T03:28:02+5:302016-11-16T03:28:02+5:30

कोंढवा खुर्द-मिठानगर या प्रभागामध्ये नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेसचे रईस सुंडके, मनसेच्या विद्यमान नगरसेविका आरती बाबर

Since all parties have been influential, they have to fight so many | सर्वच पक्ष प्रभावी असल्याने बहुरंगी लढत

सर्वच पक्ष प्रभावी असल्याने बहुरंगी लढत

हडपसर/कोंढवा : कोंढवा खुर्द-मिठानगर या प्रभागामध्ये नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेसचे रईस सुंडके, मनसेच्या विद्यमान नगरसेविका आरती बाबर, शिवसेनेचे माजी नगरसेवक भरत चौधरी, भाजपाचे आमदार योगेश टिळेकर यांनी घातलेले लक्ष, मुस्लिम मतदार जास्त असल्याने एमआयएमच्या वाढलेल्या अपेक्षा अशा सर्वच पक्षांचे प्राबल्य या प्रभागात आहे. त्यामुळे इथे कोणता पक्ष बाजी मारणार, याची अनिश्चितता वाढली आहे.
हडपसर, कोंढवा खुर्द-भाग्योदयनगर प्र.क्र.६३ चा बहुतांश भाग व कोंढवा बुद्रुक प्र.क्र.६२ चा काही भाग मिळून नवीन कोंढवा खुर्द-मिठानगर हा प्रभाग क्रमांक २७ तयार करण्यात आला आहे.
शिवसेनेचे माजी आमदार महादेव बाबर यांचा या भागात चांगला संपर्क आहे. जातप्रमाणपत्र रद्द ठरल्याने येथील शिवसेनेचे भरत चौधरी यांचे नगरसेवकपद रद्द झाले. आता खुल्या गटातून पुन्हा ते निवडणूक रिंगणात उतरण्याची शक्यता आहे.
भरत चौधरी यांच्या जागेवर झालेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेसचे रईस सुंडके निवडून आले. मात्र, त्या वेळी राष्ट्रवादी व काँग्रेसने एकत्र येऊन सुंडके यांना पाठिंबा दिला होता, त्यामुळे मतविभाजन टळले होते. आता तशीच आघाडी होईल का, याबाबत सध्या तरी अनिश्चितता आहे. काँग्रेस व राष्ट्रवादी स्वतंत्रपणे लढल्यास मतविभाजन होऊन सेना, भाजपा व मनसेला त्याचा फायदा होऊ शकतो.
मनसेच्या नगरसेविका आरती बाबर व हडपसर विभाग अध्यक्ष साईनाथ बाबर यांनी गेल्या पाच वर्षांत चांगला जनसंपर्क निर्माण केला आहे. गेल्या दोन वर्षांपासून भाजपाचे आमदार योगेश टिळेकर यांनी या प्रभागात भाजपाची ताकद वाढविण्यासाठी जोरदार प्रयत्न केले आहेत. राष्ट्रवादीचे संजय लोणकर, बाळासाहेब मस्के यांनीही प्रभागातील प्रश्नांवर आवाज उठविला आहे.
प्रभाग ६२ व ६३ मध्ये विभागलेला मुस्लिम मतदार चार सदस्यीय प्रभाग पद्धतीमुळे पुन्हा एकत्र झाला आहे. त्यामुळे नवीन प्रभागात मुस्लिम मतदारांची संख्या वाढल्याने ती येणाऱ्या निवडणुकीत निर्णायक ठरू शकतील. या प्रभागात एमआयएमनेदेखील चांगला उमेदवार देऊन जोरदार लढत देण्याची तयारी चालविली आहे. एमआयएम काँग्रेस, राष्ट्रवादीची मते खाणार की निकाल खेचून आणणारी लढत देणार, यावर तर्कवितर्क लढविले जात आहेत.
शिवसेनेकडून माजी नगरसेवक भरत चौधरी, प्रसाद बाबर, स्मिता बाबर, मेघा बाबर, राजू बाबर, सोमनाथ हरपुडे, कौसुर शेख इच्छुक आहेत.
काँग्रेसकडून रईस सुंडके, देवदास लोणकर, हमिदा सुंडके, हाजी गफूर पठाण, चेतन ढुरे, परवीन हजीज फिरोज, माया दुरे, सुलतान खान, अकबर शेख, अल्ताफ सेख, जावेद शेख इच्छुक आहेत. मनसेकडून नगरसेविका आरती बाबर, साईनाथ बाबर, अमोल शिरस, सुप्रिया शिंंदे, सतीश शिंंदे इच्छुक आहेत. भाजपाकडून महेंद्र गव्हाणे, सत्पाल पारगे, युसुफ पानसरे, संगीता लोणकर, आरिफ मुजावर, नवनाथ लोणकर, प्रवीण जगताप, इसाक पानसरे इच्छुक आहेत. राष्ट्रवादीकडून संजय लोणकर, बाळासाहेब मस्के, मदन शिंंदे, अनुराधा शिंंदे, संगीता लोणकर, राहुल लोणकर, शीतल लोणकर, अमर शेख, हुसेन खान इच्छुक आहेत.

Web Title: Since all parties have been influential, they have to fight so many

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.