पोलिसाला लुटणाऱ्या चौघांना सक्तमजुरी
By Admin | Updated: February 18, 2017 02:39 IST2017-02-18T02:39:46+5:302017-02-18T02:39:46+5:30
भाचीच्या लग्नाचा कार्यक्रम उरकून कऱ्हाडवरून मुंबईकडे निघालेल्या मुंबई पोलीस दलातील कर्मचाऱ्यास लिफ्ट दिली. गाडीत बसल्यानंतर

पोलिसाला लुटणाऱ्या चौघांना सक्तमजुरी
सासवड : भाचीच्या लग्नाचा कार्यक्रम उरकून कऱ्हाडवरून मुंबईकडे निघालेल्या मुंबई पोलीस दलातील कर्मचाऱ्यास लिफ्ट दिली. गाडीत बसल्यानंतर काही वेळाने थोडीशी झोप लागली. याचा गैरफायदा घेऊन थेट चुकीच्या रस्त्याने गाडी नेऊन प्रतिकार करताच मारहाण करून लूटमार केली. रोख रक्कम तसेच इतर वस्तू जबरदस्तीने हिसकावून घेतल्या. पुरंदर तालुक्यातील सुपे खुर्द हद्दीत रस्त्यात लुटून सोडून दिले होते. या प्रकरणाचा निकाल लागला असून यातील चौघाही आरोपींना सासवड येथील मुख्य दिवाणी न्यायाधीश व्ही. के. जाधव यांनी तीन वर्षे सक्तमजुरी प्रत्येकी दहा हजार रुपये दंड व दंड न भरल्यास आणखी तीन महिने सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे.
याबाबत शंकर संभाजी चव्हाण, रा. तडवळे, ता. आटपाडी, जि. सांगली या मुंबई दलात कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने याबाबत फिर्याद दिली होती. तर आरोपी विशाल दिलीप मोरे (वय २४), अरुण हरी राठोड (वय २२), अक्षय गजानन भुजबळ (वय २३), तिघेही रा. शिक्रापूर, ता. शिरूर आणि सोमनाथ विठ्ठल कांचन, (वय २४, रा. उरुळी कांचन, ता. हवेली, जि. पुणे) अशी शिक्षा झालेल्या आरोपींची नावे आहेत.
गाडी खाचखळग्यातून जात असल्याचे लक्षात आल्याने त्यांना जाग आली. तसेच त्यांनी याबाबत विचारणा केली असता मित्राकडे जात असल्याचे सांगितले. मात्र फिर्यादीला शंका आल्याने त्यांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यांना आरोपींनी मारहाण केली. त्यामुळे त्यांचा प्रतिकार तोकडा पडला. आरोपींनी फिर्यादी शंकर चव्हाण यांच्या हातातील मनगटी घड्याळ, रोख रक्कम, मिक्सर असा सुमारे ७०० रुपयांचा ऐवज तसेच एटीएम कार्ड व इतर कागदपत्रे, ओळखपत्र जबरदस्तीने लुटून त्या दोघांनाही रस्त्यात सोडून दिले. दरम्यान त्यांना संबंधित परिसर ओळखीचा वाटला नाही. त्यामुळे त्यांनी रस्त्याने जाणाऱ्या वाहनचालकांना माहिती विचारली असता पुरंदर तालुक्यातील सुपे खुर्दच्या हद्दीत असल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी सासवड येथे येऊन याबाबत सविस्तर फिर्याद नोंदविली.
या प्रकरणी फिर्याद दाखल करून घेतल्यानंतर पोलीस निरीक्षक सुरेशसिंह गौड यांच्या मार्गदर्शनाखालीसासवड पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक नारायण गीते यांनी तपास करून या प्रकरणातील चारही आरोपींना अटक केली. त्यानंतर सासवड येथील दिवाणी न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. सरकारी वकील डी. ए. वाकणकर यांनी फिर्यादीच्या वतीने काम पहिले. या प्रकरणी दिवाणी न्यायाधीश व्ही. के. जाधव यांनी आरोपीना प्रत्येकी तीन वर्षे सक्तमजुरी, दहा हजार रुपये दंड व दंड न भरल्यास आणखी तीन महिने सक्तमजुरी अशी शिक्षा सुनावली आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील यांनी दिली.
दि. १५ मे २०१५ रोजी फिर्यादी शंकर चव्हाण हे त्यांचे सहकारी सुरेंद्र बाबू गाडे हे त्यांच्या भाचीचे लग्न उरकून मुंबई येथे ड्युटीवर हजर होण्यासाठी कऱ्हाडमार्गे मुंबईकडे निघाले होते. त्यावेळी रस्त्याने जाणाऱ्या एका चारचाकी गाडीने त्यांना लिफ्ट दिली. गाडीमध्ये चालक व शेजारी एक व्यक्ती बसली होती. तसेच पाठीमागे आणखी एक व्यक्ती बसली होती. काही अंतरावर गाडी गेल्यानंतर फिर्यादी व त्याच्या मित्रास गाडीत झोप लागली. त्यामुळे काही लक्षात आले नाही.