सर्वच उमेदवारांचा लागणार कस
By Admin | Updated: February 13, 2017 02:23 IST2017-02-13T02:23:28+5:302017-02-13T02:23:28+5:30
नव्याने झालेली प्रभागरचना, पक्षबदल, मतदारांची सरमिसळ या कारणांमुळे जनता वसाहत-दत्तवाडी (प्रभाग क्रमांक ३०) या प्रभागात सर्वच पक्षांतील उमेदवारांचा कस

सर्वच उमेदवारांचा लागणार कस
पुणे : नव्याने झालेली प्रभागरचना, पक्षबदल, मतदारांची सरमिसळ या कारणांमुळे जनता वसाहत-दत्तवाडी (प्रभाग क्रमांक ३०) या प्रभागात सर्वच पक्षांतील उमेदवारांचा कस लागणार आहे. या प्रभागात एकूण २३ उमेदवार असून त्यात केवळ सहा अपक्षांनी आव्हान उभे केले आहे. एखाद-दुसरा अपवाद वगळता बहुतेक उमेदवार नवखे आहेत. सद्य:स्थितीत कोणत्याही एका पक्षासाठी हा प्रभाग अनुकूल असल्याचे चित्र नाही.
पालिकेच्या २०१२ च्या निवडणुकीत दत्तवाडी आणि जनता वसाहत हे दोन्ही भाग वेगळ्या वॉर्डमध्ये होते. आता नव्याने झालेल्या प्रभागरचनेत संपूर्ण जनता वसाहत व दत्तवाडीतील बराचसा भाग एकत्रित करून प्रभाग तयार करण्यात आला आहे.
मागील निवडणुकीत दत्तवाडीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला पसंती देण्यात आली होती, तर जनता वसाहतीमध्ये मनसे उमेदवाराने अधिक मते घेतली होती. जयदेवनगर व लगतच्या परिसरात भाजपाचा वरचष्मा राहिला आहे. प्रभागरचनेमध्ये सर्व पक्षांची गणिते बदलली आहेत. काही उमेदवारांनी आयत्या वेळी पक्षबदल करून तिकीट मिळविले आहे, तर काही उमेदवार नवखे असल्याने त्यांना मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी कसरत करावी लागणार आहे.
या प्रभागात गट ‘अ’मध्ये नगरसेवक राहुल तुपेरे यांच्यासमोर राष्ट्रवादी काँग्रेसकडून वैशाली चांदणे आणि भाजपाचे आनंद रिठे, काँग्रेसचे शंकर ढावरे आणि शिवसेनेचे शिवाजी दादू माने यांचे आव्हान आहे. चांदणे व रिठे यापूर्वी अनुक्रमे भारिप व राष्ट्रवादीमध्ये सक्रिय होते. तसेच भारिप-बहुजन महासंघाकडून विकास लोंढे यांच्यासह अपक्ष म्हणून राकेश भोसले, किरण ओहोळ, महेश सकट आणि अतुल सावंत हे लढत आहेत.
‘ब’ गटात मनसेतून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आलेल्या प्रिया गदादे आणि भाजपाच्या पुष्पमाला शिरवळकर यांच्यात थेट लढत होणार आहे. तसेच अपक्ष उमेदवार कलावती भाटी यांच्याव्यतिरिक्त अन्य उमेदवार रिंगणात नाहीत. ‘क’ गटातही प्रमुख पक्षांतच चौरंगी लढत रंगणार आहे. राष्ट्रवादीच्या अर्चना हनमघर, भाजपाच्या अनिता कदम, शिवसेनेच्या सुप्रिया कदम आणि भारिपच्या पंचशील कुडवे यांच्यात लढत होणार आहे.
‘ड’ गटात काँग्रेसमधून भाजपात गेलेले शंकर पवार, काँग्रेसचे प्रवीण चव्हाण, राष्ट्रवादीचे प्रेमराज गदादे, शिवसेनेचे सूरज लोखंडे आणि बहुजन समाज पक्षाचे अरविंद लोंढे यांच्यात पंचरंगी लढत होईल. अश्रफ बरकतअली आलमेल हे अपक्ष म्हणून लढत देत आहेत. (प्रतिनिधी)