सतर्कतेमुळे अपहरणाचा प्रयत्न फसला
By Admin | Updated: June 1, 2017 02:42 IST2017-06-01T02:42:07+5:302017-06-01T02:42:07+5:30
पर्वतीदर्शन परिसरात एका महिलेकडून अल्पवयीन मुलीचे अपहरण करण्याचा प्रकार मंगळवारी रात्री ८.४५ च्या सुमारास घडला

सतर्कतेमुळे अपहरणाचा प्रयत्न फसला
पुणे : पर्वतीदर्शन परिसरात एका महिलेकडून अल्पवयीन मुलीचे अपहरण करण्याचा प्रकार मंगळवारी रात्री ८.४५ च्या सुमारास घडला. परंतु नागरिकांच्या प्रसंगावधानाने हा प्रयत्न फसला. नागरिकांनी सतर्कता दाखवीत संबंधित महिलेला पोलिसांच्या ताब्यात दिले. महिलेवर पर्वतीदर्शन पोलीस चौकीमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी मुलीच्या आईने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पर्वतीदर्शन परिसरात राहणारी बारा वर्षांची मुलगी रात्री पावणेनऊ वाजता अंडी आणायला बाहेर पडली होती. तिला चॉकलेट देण्याच्या बहाण्याने घेऊन जाण्याच्या तयारीत असताना नागरिकांनी पाहिले आणि मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न हाणून पाडला. ही महिला महाराष्ट्राबाहेरची असून हिंदी भाषिक आहे. मात्र ती मूळची कुठल्या भागातील रहिवासी आहे हे सांगण्यास नकार देत आहे.
ती बुधवार पेठेतील असल्याचे कळल्यानंतर तिला पेठेतील पोलीस चौकीमध्ये नेण्यात आले; मात्र तिचे कोणतेही रेकॉर्ड नसल्याचे आढळले. दोन दिवसांपूर्वी एका मुलाच्या अपहरणाचा प्रयत्न झाला होता. त्यामुळे लहान मुले पळविणारे रॅकेट असण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने तपास सुरू झाला आहे.