मद्यपी, गर्दुल्यांचा अड्डा
By Admin | Updated: February 13, 2017 01:43 IST2017-02-13T01:43:05+5:302017-02-13T01:43:05+5:30
शहराच्या मध्यभागी असलेले नगर परिषदेचे प्रियदर्शनी संकुल मागील काही काळापासून दारुडे व गर्दुले यांचा अड्डा बनले आहे.

मद्यपी, गर्दुल्यांचा अड्डा
लोणावळा : शहराच्या मध्यभागी असलेले नगर परिषदेचे प्रियदर्शनी संकुल मागील काही काळापासून दारुडे व गर्दुले यांचा अड्डा बनले आहे. संकुलाच्या पायऱ्या व कोपरे दारूच्या बाटल्या व व्हाइटनरने भरलेल्या आहेत. मात्र नगर परिषद प्रशासन व लोकप्रतिनिधी यांचे कायम या संकुलाकडे दुर्लक्ष झाले असल्याने लाखो रुपये खर्च करुन बांधलेल्या या संकुलाची वाताहत झाली आहे.
गावठाण भागात नगर परिषदेने प्रियदर्शनी नावाने व्यापारी संकुलाची उभारणी १९९५मध्ये केली. व्यापारी गाळे, विविध कार्यालये, सांस्कृतिक सभागृह, नगर परिषद प्राथमिक शाळा, शिक्षण मंडळाचे कार्यालय, पतसंस्था या संकुलात आहेत. बांधकाम करताना योग्य खबरदारी घेतली न गेल्याने इमारतीच्या हॉलमध्ये आवाजाची समस्या निर्माण झाल्याने हे हॉल वापराविना बंद अवस्थेत होते. सहा महिन्यांपूर्वी शिवदुर्ग मित्र संस्थेने येथील बंद अवस्थेत असलेल्या सदरच्या हॉलमधून चार ट्रॉल्या कचरा बाहेर काढत मुलांकरिता इनडोअर गेम्स सुरू केल्या. मात्र, संकुलाची सुरक्षा रामभरोसे असल्याने सर्व कार्यालये बंद झाल्यानंतर संकुलाच्या परिसरात दारुडे, गर्दुले व अपप्रवृत्ती धारकांचा अड्डा भरतो. संकुलाच्या मोकळ्या जागा, पॅसेज, पायऱ्यांवर सर्रासपणे ही मंडळी नशा करतात. दारूच्या मोकळ्या बाटल्या व इतर वस्तू तेथेच टाकतात. ते पायऱ्यांवर लघुशंका करतात. संकुलाच्या सुरक्षिततेकरिता सुरक्षारक्षक नेमले आहेत. मात्र, ते दिवसा एक ठिकाणी व रात्री एक ठिकाणी काम करत असल्याने ते बहुधा झोपलेले असल्याचे पाहणीत आढळले.
संकुलाचे विदारक चित्र मनविसेचे तालुकाध्यक्ष अशोक कुटे यांनी मुख्याधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले आहे. ‘लोकमत’नेही अनेकदा संकुलाच्या दुरवस्थेबाबत वृत्त प्रसिद्ध केली आहेत. संकुलाच्या परिसरात चुकीचे उद्योग करणाऱ्यांवर कारवाईचे आश्वासन मुख्याधिकारी सचिन पवार यांनी दिले. (वार्ताहर)