दारू व्यावसायिकाची आत्महत्येची धमकी
By Admin | Updated: September 25, 2016 04:52 IST2016-09-25T04:52:51+5:302016-09-25T04:52:51+5:30
निंबूत (ता. बारामती) येथील महिलांनी २ दिवसांपूर्वी येथील दारू व्यावसायिकाविरुद्ध आवाज उठवून दारूधंदा उद्ध्वस्त केला होता. त्यानंतर दारूधंदेवाल्याने कर्जबाजारी

दारू व्यावसायिकाची आत्महत्येची धमकी
सोमेश्वरनगर : निंबूत (ता. बारामती) येथील महिलांनी २ दिवसांपूर्वी येथील दारू व्यावसायिकाविरुद्ध आवाज उठवून दारूधंदा उद्ध्वस्त केला होता. त्यानंतर दारूधंदेवाल्याने कर्जबाजारी असल्याचा कांगावा करीत दारूधंदा पुन्हा सुरू करू न दिल्यास आत्महत्या करण्याची धमकी देऊन महिलांवर दबाव आणला. याप्रकरणी लक्ष्मीनगर व आनंदनगर महिलांनी थेट करंजेपूल पोलीस दूरक्षेत्र गाठून याबाबत धमकी देणाऱ्या दारू व्यावसायिकाच्या विरोधात तक्रार अर्ज दाखल केला आहे. पोलिसांनी वेळीच कारवाई न केल्यास आंदोलन छेडण्याचा इशाराही दिला आहे.
करंजेपूल पोलीस दूरक्षेत्र येथे महिला व ग्रामस्थ यांनी पोलीस कॉन्स्टेबल बोहार्डे यांच्याकडे निवेदन दिले. निवेदनात अध्यक्षा उषा पवार, ग्रामपंचायत सदस्या शीतल पवार, जयश्री शिंदे, मनीषा पवार, ताराबाई जाधव, जयश्री परखंदे, संजय पवार, हिंदुराव जाधव, रावसाहेब बामणे, सुभाष आटोळे, विठ्ठल जाधव, सोपान आटोळे, पूनम जाधव, मोनाली पवार आदी ग्रामस्थांच्या सह्यांचे निवेदन मुख्यमंत्री, पालकमंत्री, जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक, आमदार अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे आदींना पाठविण्यात आल्याचे या वेळी महिलांनी सांगितले. लक्ष्मीनगर व आनंदनगर परिसरात प्रकाश चैनसिंग नवले व त्यांचे नातेवाईक यांचा अवैध गावठी दारूधंदा अनेक वर्ष चालू होता. याबाबत अनेकदा पोलिसांना तोंडी व लेखी निवेदन देऊनही पोलिसांनी कोणतीच कारवाई न केल्याने हा धंदा महिलांनी स्वत:हून गुरूवारी उद्ध्वस्त केला होता.
प्रकाश नवले याचा दारूधंदा बंद पडल्याने कर्जबाजारी असल्याचे सांगून तो वस्तीतील काही लोकांना दारूधंदा पुन्हा सुरू करण्याची विनंती करीत आहे. तसे न झाल्यास तो त्याच्या कुटुंबीयांसह आत्महत्या करण्याची धमकी देत आहे.