अलंकापुरी सज्ज!

By Admin | Updated: June 16, 2017 04:46 IST2017-06-16T04:46:40+5:302017-06-16T04:46:40+5:30

संतश्रेष्ठ श्री ज्ञानोबारायांच्या आषाढी पायी वारी प्रस्थान सोहळ्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे. आषाढी पायी वारी प्रस्थान सोहळा शनिवारी (दि. १७) पार पडणार आहे.

Alankapuri ready! | अलंकापुरी सज्ज!

अलंकापुरी सज्ज!

लोकमत न्यूज नेटवर्क

आळंदी : संतश्रेष्ठ श्री ज्ञानोबारायांच्या आषाढी पायी वारी प्रस्थान सोहळ्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे. आषाढी पायी वारी प्रस्थान सोहळा शनिवारी (दि. १७) पार पडणार आहे.
संपूर्ण अलंकापुरीवर सीसीटीव्हीचा वॉच असेल. वारी काळात संपूर्ण शहरात २४ तास एकूण चार विभागांमध्ये पोलीस कर्मचाऱ्यांचा खडा पहारा तैनात करण्यात आल्याने भाविकांना हा सोहळा सुरक्षितपणे अनुभवता येणार आहे. दरम्यान, विविध जिल्ह्यांतून मागविण्यात आलेला फौजफाटा शहरात दाखल झाला आहे.
या पार्श्वभूमीवर, सोहळ्यात सहभागी होण्यासाठी अलंकापुरीत भाविक-भक्त दाखल होऊ लागले आहेत. येत्या दोन दिवसांत लाखो भाविकांची मांदियाळी अलंकापुरीत हजेरी लावेल. त्यामुळे हा सोहळा संपेपर्यंत संपूर्ण शहरात गर्दी असते. अशा वेळी भाविकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होतो. सोहळ्यादरम्यान वारकऱ्यांची कुठलीही गैरसोय होऊ नये, या उद्देशाने प्रशासनाने विविध व्यापक उपाययोजनांची तरतूद केली आहे. सोहळा संपेपर्यंत २४ तास पहारा दिला जाणार आहे.
शहरातील प्रमुख असलेल्या चाकण चौक, वडगाव चौक, हजेरी मारुती, मरकळ चौक, पोलीस ठाणे परिसर, भराव रस्ता, नगर परिषद परिसर, बसथांबा परिसर तसेच मंदिर परिसरात सीसीटीव्हीचे कॅमेरे बसविण्यात आले आहेत. त्यासाठी पोलीस प्रशासन व पालिकेकडून ३५ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे वॉच ठेवण्यात आला आहे. देवस्थानाचेही फिरते सीसीटीव्ही कॅमेरे शहरावर नजर ठेवणार आहेत.
सीसीटीव्हीचे पोलीस ठाण्यातून सर्वेक्षण करण्यात येणार आहे. इंद्रायणी तीरावर कोणताही गैरप्रकार घडू नये, यासाठी सुरक्षारक्षक नेमण्यात आले आहेत.
पोलीस प्रशासनाच्या फिरत्या गाड्या लूटमार करणाऱ्या टोळ्यांवर नजर ठेवून संशयास्पद प्रकार आढळून आल्यास कडक कायदेशीर कारवाई करणार आहेत.

पोलिसांचा
फौजफाटा तैनात
अलंकापुरीत १ पोलीस अधीक्षक, ३ पोलीस उपअधीक्षक, १८ पोलीस
निरीक्षक, ५८ सहायक पोलीस उपनिरीक्षक, ६०५ पोलीस हवालदार, ६०० होमगार्ड, १०० एसआरपीचे जवान, १ बीडीडीएसचे पथक, २ बॉम्ब स्कॉड पथके तैनात करण्यात आली आहेत.
महिलांची छेडछाड होऊ नये, यासाठी अर्चना दयाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पथक तैनात करण्यात आले आहे. तसेच, सोहळा कालावधीत कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून साध्या वेशात पोलीस वॉच ठेवून आहेत.

जड वाहनांना प्रवेश बंद
चाकण-शिक्रापूर महामार्गाकडून होणारी वाहतूक शेलगाव फाट्यापासून कोयाळीमार्गे मरकळला वळविण्यात येणार आहे. तसेच, पुणे-नगर महामार्गाकडून आळंदीकडे येणारी वाहतूक मरकळमार्गे चाकण-शिक्रापूर हायवेकडे वळविली जाणार आहे. पुणे-नाशिक महामार्ग आळंदी फाट्यावरून जड वाहनांना शहराकडे प्रवेश नाही. वडगाव रस्त्यावरील विश्रांतवडाच्या पुढे पासधारक वाहने वगळता चारचाकी वाहनांना शहरात प्रवेश दिला जाणार नाही. विश्रांतवड, चऱ्होली फाट्यावर वाहनांच्या पार्किंगची सोय केली आहे.

Web Title: Alankapuri ready!