आळंदीत कच-याची पूजा
By Admin | Updated: January 28, 2015 23:45 IST2015-01-28T23:45:40+5:302015-01-28T23:45:40+5:30
आळंदीतील पद्मावती रस्ता येथील कचरा न उचलल्याने नगरसेवकांनी कचऱ्याची पूजा करून अनोखे आंदोलन करीत मुख्याधिका-यांचा निषेध केला.

आळंदीत कच-याची पूजा
आळंदी : आळंदीतील पद्मावती रस्ता येथील कचरा न उचलल्याने नगरसेवकांनी कचऱ्याची पूजा करून अनोखे आंदोलन करीत मुख्याधिका-यांचा निषेध केला.
झोपडपट्टी जवळील कचरा कार्तिकी यात्रा संपून दोन महिने होऊनही उचलला जात नाही त्यामुळे आळंदी नगरपरिषदेचे नगरसेवक राहुल चिताळकर पाटील आणि नगरसेवक प्रशांत कुऱ्हाडे यांनी पुढाकर घेऊन कचऱ्याची पूजा केली.
या वेळी उपनगराध्यक्षा अंजनाताई कुऱ्हाडे ,विरोधी पक्षनेते डि.डि.भोसले ,नगरसेविका वर्षाताई कोद्रे ,माधवी चोरडिया, मनीषा वडगावकर, प्रतिभा गोगावले ,नगरसेवक सचिन पाचंूदे ,राजेंद्र गिलबिले ,मृदूल भोसले पा. ,अशोक कांबळे, गोविंद गोरे, पांडूरंग महाराज शितोळे, सुनिल रानवडे ,कृष्णा मांजरे ,संदिप कुलकर्णी ,अमित आंद्रे ,हर्षल दौंडकर, वेदमूर्ती प्रसाद जोशी यांनी मंत्रपठन करून पूजा केली स्थानिक नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.
या वेळी नगरसेवक चिताळकर पाटील म्हणाले ‘‘की पद्मावती रोड वरील हा कचरा स्थानिक नागरिकांनी वेळोवळी प्रशासनाला सांगूनही मुख्याधिकारी विनायक औंधकर या भागावर जाणूनबुजून दुर्लक्ष करीत आहेत. याभागात दोन इंग्लिश मीडियम स्कूल असून, पद्मावती मातेच्या दर्शनाला जात असताना या घाणीतून जावे लागत आहे. या वेळी नगरसेवक प्रशांत कुऱ्हाडे म्हणाले, की आळंदीतील भाजीबाजार, कचरा, रस्ता, पाणी या मुख्य प्रश्नाबाबत आम्ही वेळोवेळी मुख्याधिकारी औंधकर यांच्याकडे समस्यांचा पाढा वाचला आहे. मात्र, ते त्याकडे दुर्लक्ष करीत आहे. विरोधी पक्षनेते भोसले पाटील म्हणाले, की आळंदीतील कचऱ्याबाबत वेळोवेळी पाठपुरावा करून सुध्दा कचऱ्याचा प्रश्न सुटत नाही लोकांच्या आरोग्याची जबाबदारी आळंदी नगरपरिषदेची असून, त्यांचे लोकप्रतिनिधी असल्याची आम्हाला लाज वाटते. लोकांचे प्रश्न सुटत नसतील, तर आम्ही राजीनामा द्यायला मागे पुढे पाहणार नाही. आळंदीत नगरसेवक आणि प्रशासन यांच्यात समतोल नसल्याने आळंदीचा विकास खुंटला आहे. (वार्ताहर)