इंदापूर : एड्सग्रस्त बालकांसाठी व पर्यावरण जनजागृतीसाठी डॉ. प्रवीण चांडक व सहकारी मित्रांची पुणे आळंदी ते पंढरपूर सायकल संवादयात्राचे इंदापूर सायकल क्लबच्या वतीने मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. त्यांना फेटा बांधून, फुलांची उधळण करीत लाडू भरवून त्यांचे स्वागत करण्यात आले.
सोमवारी (दि. १२) भिगवणहून निघून इंदापूर येथे गटनेते कैलास कदम, माजी नगरसेवक प्रशांत शिताप, नगरसेवक अनिकेत वाघ, प्रा. सुनील मोहिते, दशरथ डोंगरे, रमेश आबा शिंदे, दशरथ भोंग, श्री गानबोटे, ऋषिकेश कोतमिरे, शशिकांत वेदपाठक, ज्ञानदेव डोंगरे, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नीलकंठ मोहिते, मुख्य सचिव सागर शिंदे व समीर सय्यद यांनी स्वागत केले. इंदापूर सायकल क्लबच्या सदस्यांशी संवाद साधून सायकल वारी अकलूजमार्गे वेळापूर येथे सूर्यकांत भिसे व स्वामिराज भिसे यांच्याकडे पोहोचली आहे.
परभणी येथील होमिओपॅथिक अकॅडमी ऑफ रिसर्च अँड चॅरिटीज (एचएएआरसी) संस्थेतर्फे दि. ११ जुलैपासून पुणे आळंदी पंढरपूर व परत परभणी अशा संवाद सायकलवारीचे मार्ग ठरलेला आहे. एचएएआरसी संस्थेचे अध्यक्ष डॉ. पवन चांडक यांच्या सोबत राजेश्वर वासलवार, नितीन शेवलकर हे या सायकल मोहिमेत सहभागी झाले आहेत.
ह्या प्रबोधनात्मक सायकलवारीचे ८ वे वर्षे आहे. सामाजिक बांधिलकी म्हणून पेडल फॉर शी (महिलांसाठी एक पाऊल) अंतर्गत या सायकलवारी दरम्यान जितके अंतर कापले जाईन, त्यानुसार मोहीम पूर्ण झाल्यावर परभणी जिल्ह्यातील वंचित किशोरवयीन मुलींना मोफत सॅनिटरी पॅडचे वाटप करण्यात येणार आहे.
सामजिक कार्यकर्ते डॉ. पवन चांडक यांचा ७२ हजार किलोमीटरचा सायकलिंगचा टप्पा यंदा पूर्ण झाला आहे.
सायकल संवादवारीचा मार्ग :
दि. ११ जुलै रोजी पुणे रेल्वे स्टेशनहून सायकल वारीची सुरवात, पुणे आनंदवन मित्र मंडळ संवाद, आळंदी येथे ज्ञानेश्वर माऊली समाधी मंदिरचे शिखर दर्शन, तेथील पर्यावरणप्रेमी मित्रांना भेटून हडपसरमार्गे सोलापूर महामार्गावरून, उरुळी कांचन, चौफुला मार्गे पाटस येथील सामाजिक कार्यकर्ते यांची भेट घेऊन कुरकुंभमार्गे भिगवण येथे मुक्काम केला. भिगवण सायकलिंग क्लब आयोजित कार्यक्रमात संवाद साधून, इंदापूर येथे सामजिक कार्यकर्त्यांशी संवाद करून, पुढे वेळापूर येथून पंढरपूर येथे पालवी एड्स प्रकल्प येथे मुक्काम करून, पालवी एड्स प्रकल्पातील अनाथ मुलांशी संवाद साधून आज (दि. १३) नामदेव पायरी येथे कळसदर्शन घेऊन सोलापूर, तुळजापूर उस्मानाबादमार्गे परभणीकडे परतीच्या प्रवासास निघाले आहेत.
इंदापूर येथे सायकल वारीतील डॉ. पवन चांडक, राजेश्वर वासलवार, नितीन शेवलकर यांचे स्वागत करताना इंदापूर सायकल क्लबचे पदाधिकारी.