आकुर्डीत गोळीबार

By Admin | Updated: September 11, 2014 04:24 IST2014-09-11T04:24:12+5:302014-09-11T04:24:12+5:30

हातात पिस्तूल, नंग्या तलवारी व कोयता अशी शस्त्रे घेतलेल्या साथीदारांबरोबर आकुर्डी गावठाण परिसरात आलेल्या सराईत गुंड सोनू ऊर्फ सोन्या काळभोर (वय २१, रा. आकुर्डी) याने दहशत माजविण्याचा प्रयत्न केला

Akurdy firing | आकुर्डीत गोळीबार

आकुर्डीत गोळीबार

पिंपरी : हातात पिस्तूल, नंग्या तलवारी व कोयता अशी शस्त्रे घेतलेल्या साथीदारांबरोबर आकुर्डी गावठाण परिसरात आलेल्या सराईत गुंड सोनू ऊर्फ सोन्या काळभोर (वय २१, रा. आकुर्डी) याने दहशत माजविण्याचा प्रयत्न केला. १० ते १५ जणांच्या टोळक्याने दुचाकी वाहनावर येऊन नागरिकांना शिवीगाळ करीत दुकानासमोर बियरच्या बाटल्या फोडल्या. यात एक जण जखमी झाला. हा प्रकार हनुमान चौकातील गणेश मंदिर परिसरात बुधवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास घडला. नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली असून, या भागांतील दुकाने बंद करण्यात आली.
गुंड सोन्या काळभोर आपल्या १० ते १५ साथीदारांसह दुचाकीवर आला. त्यांच्या हातात तलवारी व कोयते होते. आरडाओरडा आणि शिवीगाळ करीत ते हनुमान चौकात आले. येथील दुकाने, थांबलेल्या दुचाकी वाहने आणि रस्त्यांवर बियरच्या बाटल्या फोडल्या. हनुमान तरुण मंडळाच्या श्री गणेश मंदिरासमोर आल्यानंतर पिस्तुलातून हवेत गोळ्या झाडल्या. यानंतर लगेच ते पळून गेले. याद्वारे परिसरात दहशत माजविण्याचा प्रयत्न केला. यात नीलेश सुधीर पावसकर (वय ४०, रा. निगडी) हे जखमी झाले आहेत. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये घबराट पसरली. व्यापाऱ्यांनी त्वरित दुकाने बंद केली.
गुंड सोन्या काळभोर हा १५ दिवसांपूर्वीच खुनाचा आरोपातून तुरुंगातून सुटून आला होता. सन २०११ मध्ये खूनप्रकरणी तो शिक्षा भोगत होता. तुरुंगातून परतल्यानंतर त्याची आकुर्डी परिसरात फटाके फोडून मिरवणूक काढण्यात आली. खून, खुनाचा प्रयत्न, हाणामारी असे विविध गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत.
या प्रकाराची खबर मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलीस उपायुक्त डॉ. राजेंद्र माने, सहायक पोलीस आयुक्त रमेश भुरेवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय नाईक-पाटील यांनी परिसराची पाहणी केली. पिस्तुलातून हवेत गोळीबार केलेल्या ४ पुंगळ्या सापडल्या. तपासासाठी गुंडाच्या मागावर पथक रवाना झाले. आकुर्डी गावठाण भागात दहशत माजविण्याचा प्रयत्न करण्यासाठी सोन्या काळभोर याने हा प्रकार केल्याचा प्राथमिक अंदाज पोलीस उपायुक्त डॉ. राजेंद्र माने यांनी व्यक्त केला. (प्रतिनिधी)

Web Title: Akurdy firing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.