पुणे : ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी पुण्यातून बुधवारी (दि. १९) दुपारी ३ वाजता सुटलेली विशेष रेल्वे नवी दिल्लीमध्ये शुक्रवारी मध्यरात्री १ वाजता पोचली. तब्बल ३६ तासांचा प्रवास करून साहित्यिक रात्री दिल्लीत पोचले आहेत. प्रवासादरम्यान सर्व सोयी-सुविधा दिल्याने साहित्यिकांना कसलाही त्रास झाला नाही.
दिल्लीत ७० वर्षानंतर मराठी साहित्य संमेलन होत आहे. शुक्रवारी (दि.२१) दुपारी उद्घाटन झाल्यानंतर २३ फेब्रुवारीपर्यंत हे संमेलन तालकटोरा स्टेडियममध्ये रंगणार आहे. यासाठी पुण्यातून रसिक व साहित्यिकांसाठी विशेष रेल्वे बुक केली होती. ती रेल्वे बुधवारी पुण्यातून निघाली आणि शुक्रवारी मध्यरात्री १ वाजता दिल्लीत पोचली. त्यामुळे सर्व रसिक, साहित्यिकांना रेल्वेमध्ये ३६ तास घालावे लागले. यंदा रेल्वेमध्ये साहित्ययात्री संमेलन आयोजित केल्याने कोणीही कंटाळले नाही. रेल्वेमध्ये विविध उपक्रम राबविले गेले. तसेच सरहद संस्थेकडून रेल्वेमध्ये स्वयंसेवकांची खास फौज होती. त्यांनी सर्वांना पाणी, नाश्ता व इतर सोयी उपलब्ध करून दिल्या. त्यामुळे कोणाचीही गैरसोय झाली नाही, अशा भावना साहित्यिकांनी व्यक्त केल्या.
दरम्यान, घुमानला जातानाचा अनुभव हाताशी असल्याने आयोजकांनी या वेळी विशेष खबरदारी घेतली होती. घुमानच्या वेळी रेल्वेमध्ये प्रचंड गैरसोय पहायला मिळाली हाेती. पण यंदा ती गैरसोय होऊ दिली नाही.