विमानतळ घिरट्या घालतोय!
By Admin | Updated: September 30, 2015 01:29 IST2015-09-30T01:29:22+5:302015-09-30T01:29:22+5:30
शिरूर व खेडमधील स्पेशल इकॉनॉमिक झोन (सेझ) प्रकल्प बारगळल्यानंतर या भागात होणारे आंतरराष्ट्रीय विमानतळही घिरट्या घालू लागला आहे.

विमानतळ घिरट्या घालतोय!
शिक्रापूर : शिरूर व खेडमधील स्पेशल इकॉनॉमिक झोन (सेझ) प्रकल्प बारगळल्यानंतर या भागात होणारे आंतरराष्ट्रीय विमानतळही घिरट्या घालू लागला आहे. त्यामुळे देश-विदेशातून या भागात जागेमध्ये गुंतवणूक केलेल्या अनेकांचे धाबे दणाणले आहे.
महाराष्ट्र विमानतळ विकास महामंडळाने चाकणऐवजी दुसरी जागा शोधण्याची सूचना राज्य सरकारला केल्यानंतर विमानतळाकरिता तीन जागांचा सर्व्हे केला. यामध्ये ‘सेझ’च्या पहिल्या टप्प्यात संपादित केलेल्या केंदूर, निमगाव, दावडी, कनेरसर या भागातील काही जागांचा आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी सर्व्हे करण्यात आला. तर इतर दोन जागांचाही सर्व्हे करण्यात आला आहे. याबाबत अहवाल महाराष्ट्र एअरपोर्ट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनकडे पाठवण्यात आला असून, येत्या महिनाभरात यावर उच्चाधिकार समितीची बैठक होणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजते. ‘सेझ’साठी संपादित पहिल्या टप्प्यातील काही जागांमध्ये कंपन्या सुरू झाल्या आहेत तर दरम्यानच्या काळात सेझला विरोधाबरोबरच कायदेशीर अडचणीत सापडलेला ‘सेझ’ रद्द करण्यात आला.
सेझच्या दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यात पूर, वाफगाव, पाबळ, गोसासी, वरुडे, वाकळवाडी आदी भागांत शेतकऱ्यांच्या सातबारावर सात वर्षांपूर्वी सेझसाठी भूसंपादन शिक्के मारण्यात आले.
‘सेझ’ बारगळल्यानंतरही हे शिक्के अद्यापही तसेच असून, राजकीय व एमआयडीसी यांच्या गोंधळात अद्यापही हे सातबारे कोरे झालेले नाहीत. एमआयडीसी व भारत फोर्ब्ज कंपनीच्या माध्यमातून सात वर्षांपूर्वी सुरू झालेल्या ‘सेझ’ प्रकल्पाला चार गावांतील भूसंपादनावर समाधान मानावे लागले. त्यानंतर याच संपादित काही भागांत आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी हिरवा कंदील दाखविण्यात आला असून, काही तांत्रिक व कायदेशीर अडचणी आल्यास पुन्हा एकदा विमानतळाच्या घिरट्या सुरू राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे. (वार्ताहर)
-------
शिरूर व खेडच्या १७ गावांतील ‘सेझ’ चार गावातील भूसंपादनानंतर बंद पडला तर त्यातही अनेक त्रुटींमुळे शेतकरी व भारत फोर्ज यांची एकत्रित कंपनी बंद पडली. आता या जागेवर काही भागात कंपन्या झाल्या तर उर्वरित जागांवर व त्या जागांची सलगता शोधून आंतरराष्ट्रीय विमानतळ तरी या भागात होईल, की पुन्हा विमानतळ घिरट्या घालणार.
-----
विकासाच्या दृष्टीने विमानतळ हा पुणे जिल्ह्याच्या दृष्टीने औद्योगिक व सामाजिक दृष्टीने एक प्रकारे मानाचा तुरा समजला जात असला, तरी
हा मानाचा तुरा राजकीय व जागेच्या खेळात पूर्ण होत नसल्याची चर्चा सध्या सर्व्हे झालेल्या भागात होत आहे. पुणे जिल्ह्याचे ‘विमानतळ’ कदाचित शेजारच्या जिल्ह्यात येत्या काही दिवसांत दिसल्यास वावगे वाटण्याचे कारण नाही. असा हा राजकारणापलीकडला विमानतळ एकदा कुठे तरी होऊ द्या, एकदाच... म्हणण्याची वेळ उद्योजक, शेतकरी, विकसक, गुंतवणूकदार यांच्यावर
आली आहे.