जुन्नर, आंबेगाव व खेड तालुक्यांतून एड्स हद्दपार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2015 01:54 IST2015-11-30T01:54:30+5:302015-11-30T01:54:30+5:30
वीस वर्षांपूर्वी जुन्नर, आंबेगाव व खेड या तालुक्यांतील नागरिकांचा मुंबईशी भाजीपाला व्यवसायाच्या निमित्ताने संबंध असल्याने, एचआयव्ही हा रोग या तालुक्यांत मोठ्या प्रमाणात झाला होता.

जुन्नर, आंबेगाव व खेड तालुक्यांतून एड्स हद्दपार
पिंपळवंडी : वीस वर्षांपूर्वी जुन्नर, आंबेगाव व खेड या तालुक्यांतील नागरिकांचा मुंबईशी भाजीपाला व्यवसायाच्या निमित्ताने संबंध असल्याने, एचआयव्ही हा रोग या तालुक्यांत मोठ्या प्रमाणात झाला होता. आज परिस्थिती बदलली असून, नागरिक जागरूक झाल्यामुळे तिन्ही तालुक्यांतून रोग जवळजवळ हद्दपार झाला आहे.
आज एड्स निर्मूलन दिवस आहे. या रोगाने अमेरिकेचा प्रसिद्ध हिरो रॉक हडसन याचे या रोगाने निधन झाले. या वृत्ताने सर्व जगात खळबळ उडाली होती. त्या वेळी या रोगाची सुरुवात होती, यानंतर दोन दशके या रोगाने भारतासह संपूर्ण जगात दहशत निर्माण केली. भारतात तर या रोगाचे निदान अंतिम टप्प्यात झाल्यामुळे, अनेक जण या रोगामुळे दगावले. हा रोग आपल्याला होईल, या भीतीने एड्सग्रसतांना अक्षरक्ष: वाळीत टाकले होते. यामुळे अनेकानी आपल्या कुटुंबासह इहलोकीचा मार्ग पत्करला होता. सरकारने वेळीच याचे गांर्भीय ओळखून जाहिरात व पथनाट्यातून लोकांचे प्रबोधन केले. या रोगामुळे अनेक कुटुंबाची धूळधाण झाली. जुन्नर तालुक्यातील एका कुटुंबातील सर्वांनी येडगाव धरणाच्या भिंतीवरून उडी मारून आत्महत्या केली होती. ही घटना सर्वांना चटका लावून गेली. या घटनेमुळे पिंपळवडी येथील डॉ. अशोक कोठाडिया यांनी सामाजिक भावनेतून या दुर्धर रोगाची माहिती होण्यासाठी एका कलाकेंद्रावर निशुल्क सेवा शिबिर त्यानी घेतले होते. धक्कादायक बाब म्हणजे डॉ. कोठाडियांनी या शिबिरात एकूण १२५ जणांची तपासणी केली. यामध्ये २५ जणांना या रोगाची लागण झाली होती. या रोगाने खचून न जाता, त्याला खंबीरपणे सामोरे जा, असा सल्ला देऊन संपूर्ण मदत करण्याची तयारी डॉ. कोठाडियांनी त्या वेळी दर्शविली होती. त्याचा अनेक पीडितांना फायदा झाला. (वार्ताहर)