दिल्लीतील आंदोलन शेतीच्या कंपनीकरणाच्या विरोधात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:01 IST2021-02-05T05:01:27+5:302021-02-05T05:01:27+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : शिक्षण, आरोग्य यानंतर आता शेतीचेही कंपनीकरण करण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न आहे. शेतकऱ्यांचे दिल्लीतील आंदोलन ...

दिल्लीतील आंदोलन शेतीच्या कंपनीकरणाच्या विरोधात
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : शिक्षण, आरोग्य यानंतर आता शेतीचेही कंपनीकरण करण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न आहे. शेतकऱ्यांचे दिल्लीतील आंदोलन शेतीच्या या कंपनीकरणाच्या विरोधात असल्याचे प्रतिपादन नर्मदा आंदोलनाच्या प्रणेत्या मेधा पाटकर यांनी केले. हे आंदोलन महात्मा गांधीजींच्या सत्याग्रहाच्या मार्गानेच चालले आहे, असेही त्यांनी ठामपणे नमूद केले.
लोकशाही उत्सव समितीच्या वतीने एस. एम. जोशी सभागृहात पाटकर, सीमा कुलकर्णी व नितीश यांचे दिल्लीतील शेतकरी आंदोलना संदर्भात व्याख्यान झाले. तिन्ही वक्त्यांनी केंद्र सरकारची या आंदोलनाकडे पाहण्याची दृष्टी योग्य नसल्याचे सांगितले. विमानतळ, रेल्वेचे कंपनीकरण झाले. यात सरकारची तिजोरी भरते आहे, पण वाढती विषमता बीभस्त होत चालली आहे. त्याविरोधात बोलायचे की नाही? म्हणून आंदोलनात सहभागी व्हा असे आवाहन पाटकर यांनी केले.
पाटकर म्हणाल्या की, जन आंदोलनाचा समन्वय या संयुक्त मोर्चाच्यावतीने मी स्वतः आंदोलनात सहभागी होते. आंदोलकांना बदनाम करण्याचा प्रकार सुरूवातीपासून होता. त्यांच्या घरात ट्रँक्टर आहे? तर तो आंदोलनात दिसणारच! नातेवाईक परदेशात आहेत तर ते मदत करणारच! गावांगावांमधून अन्नधान्य येत होते त्यात गैर काय आहे? कायद्यानेच कमरेला असलेली तलवार, कृपाण आंदोलकांंनी ६० दिवसात कधीच काढली? नाही व प्रजासत्ताक दिनीच कशी काढली? आंदोलनात घुसलेल्यांनीच हा प्रकार केला.
आंदोलन दडपशाहीने दाबून टाकण्याच्या प्रयत्नात सरकार लोकशाहीची चौकट मोडत आहे. सरकार आणि जनता यांच्यातील नातेच केंद्र सरकार संपवून टाकत आहे अशी टीका पाटकर यांनी केली. सीमा कुलकर्णी यांंनी आंदोलनातील महिलांचा सहभाग विषद केला. संसदीय नियमांची पायमल्ली करत तिन्ही कायदे मंजूर केल्याचे नितीश म्हणाले. समितीच्या अध्यक्ष सुनीती सु. र. यांंनी स्वागत केले. सचिव मिलींद कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले.