एजंटांना अधिकृत परवाना द्यावा
By Admin | Updated: January 21, 2015 00:33 IST2015-01-21T00:33:44+5:302015-01-21T00:33:44+5:30
अनेक वर्षांपासून प्रादेशिक परिवहन कार्यालयासह (आरटीओ) बहुतेक सर्वच शासकीय कार्यालयांमध्ये एजंटांमार्फत कामे केली जातात.

एजंटांना अधिकृत परवाना द्यावा
पुणे : अनेक वर्षांपासून प्रादेशिक परिवहन कार्यालयासह (आरटीओ) बहुतेक सर्वच शासकीय कार्यालयांमध्ये एजंटांमार्फत कामे केली जातात. आता ही समाजाची एक गरज बनली आहे. त्यामुळे केवळ आरटीओतील एजंट हद्दपार करून त्यांच्यावर अन्याय करू नये. नागरिकांची फसवणूक करणाऱ्या काही एजंटांमुळे सर्वांनाच काम करू न देणे योग्य नाही. त्यामुळे त्यांना अधिकृत परवाना द्यावा, अशी मागणी पुणे आरटीओमधील एजंटांनी केली आहे. या मागणीसाठी मंगळवारी आंदोलनही करण्यात आले.
परिवहन आयुक्त महेश झगडे यांनी राज्यातील सर्व आरटीओतील एजंटगिरीला आळा घालण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार पुणे आरटीओंनी सोमवारी आवारातील सर्व एजंटांना पोलिसांच्या मदतीने हद्दपार केले. याला विरोध करण्यासाठी प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाचे माजी सदस्य व महाराष्ट्र राज्य माल व प्रवासी वाहतूक संघटनेचे अध्यक्ष बाबा शिंदे यांच्या नेतृत्वाखाली कार्यालयाबाहेर आंदोलन करण्यात आले.
या वेळी प्रादेशिक परिवहन अधिकारी जितेंद्र पाटील यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. या वेळी विविध वाहतूक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.(प्रतिनिधी)
पुणे विभागात सुमारे ४० ते ५० टक्के काम एजंटांमार्फत केले जाते. प्रामाणिक एजंट काम करून नागरिकांना मदत करतात, त्यांना शासनाने व्यवसायाचा अधिकृत परवाना देण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी नियमावली करावी. गैरप्रकार घडल्यास संबंधित एजंट जबाबदार धरला जाईल. कामाचे दर निश्चित केल्यास आर्थिक फसवणूकही होणार नाही.
- बाबा शिंदे ,
अध्यक्ष , महाराष्ट्र राज्य माल व प्रवासी वाहतूक संघटना