दोन महिन्यांनंतरही विद्यार्थी गणवेशाविना
By Admin | Updated: July 27, 2015 03:42 IST2015-07-27T03:42:54+5:302015-07-27T03:42:54+5:30
प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांच्या साहित्य खरेदीचे आर्थिक अधिकार महापालिका प्रशासनाला की शिक्षण मंडळ पदाधिकाऱ्यांना असा वाद अनेक

दोन महिन्यांनंतरही विद्यार्थी गणवेशाविना
प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांच्या साहित्य खरेदीचे आर्थिक अधिकार महापालिका प्रशासनाला की शिक्षण मंडळ पदाधिकाऱ्यांना असा वाद अनेक दिवस सुरू होता. मात्र, त्याचा फटका थेट विद्यार्थ्यांना बसला आहे. आतापर्यंत शिक्षण मंडळाकडून गणवेश खरेदी व वाटपाला उशीर होतो, अशी ओरड केली जात असे. त्यामुळे या वर्षी महापालिका प्रशासनाने खरेदीची प्रक्रिया राबविली. मात्र, त्यानंतरही ‘ये रे माझ्या मागल्या’ याप्रमाणे यंदाही विद्यार्थ्यांना गणवेशाची प्रतीक्षा करावी लागली आहे.
महापालिकेच्या सुमारे ३१० शाळांत साधारण ८० हजार विद्यार्थी शिकत आहेत. प्रत्येक विद्यार्थ्याला दोन गणवेश याप्रमाणे १ लाख ६० हजार गणवेश खरेदीला ३१ मार्चला धोरणात्मक मान्यता घेण्यात आली होती. मात्र, त्यानंतर निविदा प्रक्रिया उशिरा राबविण्यात आली. अगदी शाळा सुरू होण्याच्या उंबरठ्यावर जूनच्या पहिल्या आठवड्यात सुमारे ५ कोटींची आर्थिक तरतूद करण्यात आली. मात्र, शाळा सुरू होऊन दोन महिने होत आले, तरीही विद्यार्थ्यांना गणवेश मिळालेले नाहीत. महापालिकेच्या शाळेत जाणारे बहुतांश विद्यार्थी गोरगरीब व झोपडपट्टी भागातील असतात. काही विद्यार्थी जुन्या गणवेशाला ठिगळे लावून शाळेत जात आहेत.