झोपमोड केल्यामुळे शिक्षकाने मुलीच्या कानफटात लगावली
By Admin | Updated: July 10, 2015 02:32 IST2015-07-10T02:32:19+5:302015-07-10T02:32:19+5:30
जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत चक्क वर्गातच दिवसा झोपलेल्या शिक्षकाची झोपमोड झाल्याने त्याने दुसरीतील एका मुलीच्या जोरदार कानफटात मारली.

झोपमोड केल्यामुळे शिक्षकाने मुलीच्या कानफटात लगावली
कवठे येमाई : शिरूर तालुक्यातील कवठे येमाई येथील माळवदेवस्तीत सुरू असलेल्या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत चक्क वर्गातच दिवसा झोपलेल्या शिक्षकाची झोपमोड झाल्याने त्याने दुसरीतील एका मुलीच्या जोरदार कानफटात मारली. त्यामुळे मुलीच्या गालावर उठलेला वण दुसऱ्या दिवशीही कायम होता.
घाबरलेली ही मुलगी रात्री उशिरापर्यंत शाळेतून घरी न आल्याने पालकांनी तिचा शोध घेतला असता ती सापडली़; पण तिच्या गालावर उठलेले माराचे वण पाहून पालकांनी तिला विचारले असता हा प्रकार उघड झाला़ मुलीच्या पालकांनी स्थानिक शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष कैलास बच्चे, सदस्य काशिनाथ माळवदे, उत्तम जाधव यांना बुधवारी (दि. ८) घडलेल्या प्रकाराची माहिती दिली़
माळवदेवस्ती (कवठे येमाई) येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत घडलेल्या मारहाण प्रकाराबाबत स्थानिक शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष कैलास बच्चे व ग्रामस्थांनी दिलेल्या निवेदनात या शिक्षकाच्या शालेय कामकाजाबाबत स्पष्टपणे नाराजी व्यक्त केली आहे. संजय वसंत बागले हे २००६ पासून या शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत असून, शाळेत अवेळी येणे, दुपारी वर्गातच पथारी टाकून झोपणे, मुलांनी पालकांना सांगितल्यास मुलांनाच चोप देणे असे प्रकार सातत्याने करीत असल्याचे ग्रामस्थांनी निवेदनात म्हटले आहे. या शिक्षकाबाबत केंद्रप्रमुखांकडे ३ वर्षांपासून सातत्याने तक्रार करूनही केंद्रप्रमुख व शिक्षण विभागाचे अधिकारी या प्रश्नी पांघरूणच घालण्याचे काम करीत आहेत. काल मारहाण झाल्यानंतर आज दिवसभर मुलीचा गाल सुजलेलाच असल्याचे पालकांनी सांगितले.
या शिक्षकाची येथून तातडीने बदली करण्यात यावी; अन्यथा सदर शाळेस टाळे ठोकण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. याबाबत गटविकास अधिकारी संजय चिल्लाळ व गटशिक्षणाधिकारी अर्जुन मिसाळ यांच्याशी संपर्क साधला असता केंद्र प्रमुखांना या प्रकरणी तातडीने अहवाल देण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, त्यानंतरच याबाबत कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत. आज शिक्षण विभागाचे केंद्रप्रमुख व पोलिसांनीही या शाळेला भेट देऊन पाहणी केली. सायंकाळी मुलीचे पालक सुदाम माळवदे व स्थानिक शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष कैलास बच्चे आणि ग्रामस्थांनी या प्रश्नी संयमाची भूमिका घेऊन या बेजबाबदार शिक्षकाची येथून तातडीने बदली करण्याची मागणी केली.
(वार्ताहर)