पिंपरीनंतर पुणे महापालिकेतही सापडला लाचखोर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:15 IST2021-08-24T04:15:39+5:302021-08-24T04:15:39+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : शाळादुरुस्तीच्या कामाचे बिल मंजूर करण्यासाठी ४० हजार रुपयांची लाच घेताना महापालिकेच्या रस्ते विभागातील उपअभियंत्यास ...

पिंपरीनंतर पुणे महापालिकेतही सापडला लाचखोर
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : शाळादुरुस्तीच्या कामाचे बिल मंजूर करण्यासाठी ४० हजार रुपयांची लाच घेताना महापालिकेच्या रस्ते विभागातील उपअभियंत्यास सोमवारी (दि. २३) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पुणे महापालिकेत सापळा रचून रंगेहाथ पकडले. सुधीर विठ्ठलराव सोनवणे (वय ५१) असे या अभियंत्याचे नाव आहे.
पिंपरी महापालिकेतील लाच प्रकरण गाजत असतानाच पुणे महापालिकेतही लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केल्याने शहरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी एका बांधकाम ठेकेदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली आहे.
या ठेकेदाराने २०१८ -१९ मध्ये केलेल्या शाळेच्या दुरुस्तीच्या कामांचे बिल पास झाले नसल्याने त्यांनी उपअभियंता सुधीर सोनवणे यांची भेट घेतली. बिल मंजूर करणे व यापूर्वी दुसऱ्या कामाचे बिल मंजूर केल्याचा मोबदला म्हणून सोनवणे यांनी ठेकेदाराकडे ५० हजार रुपयांची मागणी केली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे याची तक्रार आल्यानंतर, त्यांनी सोमवारी सुधीर सोनवणे त्यांच्या कार्यालयात असताना पडताळणी केली. तेव्हा त्यांनी लाचेची मागणी केल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर सोमवारी दुपारी पुणे महापालिकेत सापळा रचण्यात आला. महापालिकेतील पार्किंगच्या आवारात तक्रारदार ठेकेदाराकडून ४० हजार रुपये स्वीकारताना सुधीर सोनवणेला रंगेहाथ पकडण्यात आले. शिवाजीनगर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमाखाली गुन्हा नोंदविण्यात येत आहे. पोलीस निरीक्षक भारत साळुंखे तपास करीत आहेत.
चौकट
...अन् त्याने वाढवली लाचेची रक्कम
बिल मंजुरीसाठी सुधीर सोनवणे याने आधी संबंधित ठेकेदाराकडे ३५ हजार रुपयांची लाच मागितली होती. त्यानंतर त्याला आठवले की यापूर्वी दुसऱ्या कामाचे बिल मंजूर केले आहे. त्याचा मोबदला मिळालेला नाही. त्यामुळे त्याने लाचेची रक्कम ३५ हजार रुपयांवरून वाढवून ५० हजार रुपये केली. त्यापैकी ४० हजार रुपये स्वीकारताना त्याला पकडण्यात आले.