खून करून युवकाचा मृतदेह टाकला जाळून
By Admin | Updated: October 27, 2015 01:06 IST2015-10-27T01:06:56+5:302015-10-27T01:06:56+5:30
एकमेकांकडे पाहण्याच्या कारणावरून झालेल्या वादामधून १९ वर्षीय युवकाचे अपहरण करून त्याचा खून करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे

खून करून युवकाचा मृतदेह टाकला जाळून
पुणे : एकमेकांकडे पाहण्याच्या कारणावरून झालेल्या वादामधून १९ वर्षीय युवकाचे अपहरण करून त्याचा खून करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. खून केल्यानंतर या युवकाचा मृतदेह भोरजवळील सारोळा गावच्या हद्दीतील नदीपात्रात जाळून त्याची राख नदीमध्ये सोडून देण्यात आल्याचेही तपासामध्ये निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी याप्रकरणी एकाला ताब्यात घेतले असून अन्य आरोपींचा शोध सुरू आहे.
आकाश अशोक पवार (वय १९, रा. रजनी कॉर्नर, बालाजीनगर, धनकवडी) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. याप्रकरणी सागर घरमट्टी (वय २६, रा. रजनी कॉर्नर, बालाजीनगर) याला ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आकाश शनिवारी बेपत्ता झाल्यानंतर सहकारनगर पोलीस ठाण्यात मिसिंगची तक्रार दाखल करण्यात आली होती. त्याचा तपास सहकारनगर पोलीस करीत होते. तपासादरम्यान आकाशचा खून झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार सागरला ताब्यात घेण्यात आले. तेव्हा जी धक्कादायक माहिती समोर आली त्याने पोलीसही हादरून गेले. आरोपीसोबत आकाश याची दहा दिवसांपूर्वी एकमेकांकडे बघण्यावरून वादावादी झाली होती.
ताब्यात घेण्यात आलेला आरोपी तसेच त्याचे अन्य तीन साथीदार सराईत गुन्हेगार आहेत. त्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. पाच वर्षांपूर्वी धनकवडीमध्ये उसळलेल्या टोळीयुद्धातील बैजू नवघने टोळीशी सर्व आरोपी संबंधित असल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. तपासासाठी सहकारनगर पोलिसांचे एक पथक सारोळा येथे रवाना झाले असून अन्य आरोपींचा शोध सुरू असल्याचेही पोलिसांनी सांगितले. (प्रतिनिधी)