Walmik Karad: बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाशी संबंधित खंडणीच्या गुन्ह्यात फरार असलेला वाल्मीक कराडला १४ दिवसांची सीआयडी कोठडी सुनावण्यात आली आहे. गेले २२ दिवस फरार असलेला वाल्मीक कराड मंगळवारी सीआयडीसमोर शरण आला. त्यानंतर त्याला केज न्यायालयाने कोठडी सुनावली. यानंतर आता विविध प्रतिक्रिया उमटू लागल्या असून वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनीही याप्रकरणाबाबत भाष्य केलं आहे. वाल्मीक कराड कुठे होता हे पोलीस खात्याला माहीत नव्हतं याचं आश्चर्य वाटतं. वाल्मीक कराड प्रकरणात सरकारवर दबाव आहे, मात्र मुख्यमंत्र्यांनी त्याला बळी पडू नये असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.
खंडणीचा गुन्हा दाखल झाल्यापासून वाल्मीक कराड फरार होता. पोलिसांसह सीआडीचे पथक बरेच दिवस त्याचा शोध घेत होते. मात्र त्याचा कोणताही पत्ता लागत नव्हता. त्यानंतर अचानक दोन दिवसांपासून वाल्मीक कराड शरण येणार असल्याची चर्चा सुरु झाली. त्यानंतर सोमवारी रात्री अक्कलकोट स्वामींचे दर्शन घेऊन वाल्मीक कराड सकाळी पुण्यात दाखल झाला व दुपारी सव्वाबारा वाजता सीआयडी मुख्यालयात शरण आहे. तीन तास चौकशी केनंतर सीआयडीचे पथक वाल्मीक कराडला घेऊन केजकडे रवाना झाले.
केज न्यायालयाने वाल्मीक कराडला १४ दिवसांची सीआयडी कोठडी देण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर वाल्मिक कराडला बीड शहर पोलीस ठाण्यात नेण्यात येत आहे. या सगळ्या प्रकारावर बोलताना मुख्यमंत्र्यांनी दबावाला बळी पडू नये असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. पुण्यात कोरेगाव भीमा येथील शौर्य दिनाच्या कार्यक्रमात प्रकाश आंबेडकर बोलत होते.
"पोलीस खात्याला वाल्मिक कराड कुठे लपलेला आहे हे माहिती नाही याचे मला आश्चर्य वाटत आहे. तपास यंत्रणांनी आपले अपयश वारंवार लोकांसमोर आणू नये. सरकामध्ये यासंदर्भात दबाव आहे याची मला जाणीव आहे. त्यामुळे त्यांनी या प्रकरणात लवकरात लवकर कारवाई करावी एवढीच त्यांना विनंती आहे. मुख्यमंत्र्यांनी दबावाला बळी पडू नये एवढीच माझी विनंती आहे," असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.
कोणालाही सोडणार नाही - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
"कोण काय म्हणतो ते महत्त्वाचे नाही. जिथे पुरावा आहे तिथे आम्ही कोणालाही सोडणार नाही. आम्ही पुरावे गोळा करतच आहोत, आणखी कोणाकडे असतील तर तेही द्यावेत. संतोष देशमुख यांच्या हत्येला कारणीभूत असलेल्यांना शिक्षा झाली पाहिजे हे महत्त्वाचे आहे," अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.