अखेर चौकशी अहवाल तयार
By Admin | Updated: June 26, 2015 04:25 IST2015-06-26T04:25:18+5:302015-06-26T04:25:18+5:30
अंबर दिव्याची गाडी वापरून शिरवळ तालुक्यातील वडवाडीत दबंगगिरी करणाऱ्या पिंपरी-चिंचवड महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त तानाजी शिंदे

अखेर चौकशी अहवाल तयार
पिंपरी : अंबर दिव्याची गाडी वापरून शिरवळ तालुक्यातील वडवाडीत दबंगगिरी करणाऱ्या पिंपरी-चिंचवड महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त तानाजी शिंदे यांच्यावरील गुन्ह्यांच्या चौकशीचा अहवाल तयार झाला असून, तो लवकरच खंडाळा न्यायालयात सादर होणार आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक अशोक शेळके यांनी लोकमतशी बोलताना दिली. त्यामुळे शिंदे अडचणीत येणार असल्याचे बोलले जात आहे.
सातारा जिल्ह्यातील शिरवळ तालुक्यातील खंडाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ९ डिसेंबर २०१४ ला वडवाडी येथे जमिनीच्या वादातून भांडणे-हाणामारीचा प्रकार घडला होता. दरोड्याबरोबरच बेकायदा जमाव जमवणे, धमकी देणे, नुकसान करणे, दंगल माजवणे असे आरोप शिंदे यांच्यावर केले होते. त्यानुसार खंडाळा पोलीस ठाण्यात शिंदे यांच्यासह मुलगा अनिकेतसह आणखी पाच अनोळखी व्यक्तींच्या विरोधात हा गुन्हा दाखल झाला होता. शिंदे हे परवानगी नसताना स्वत:च्या गाडीवर अंबर दिवा लावून महापालिका हद्दीबाहेर गेल्याचे प्रकरण उघडकीस आले होते. महापालिकेतही या प्रकरणाची आणि शिंदेंच्या दबंगगिरीची चर्चा जोरदार रंगली होती. या प्रकरणानंतर काही दिवस ते दीर्घ रजेवर गेले होते. दरम्यानच्या कालखंडात शिंदे यांना अटकपूर्व जामीन मिळाला होता. त्यानंतर न्यायालयाने खंडाळा पोलिसांना या प्रकरणाची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार पोलिसांकडून या प्रकरणाची चौकशी पूर्ण झाली आहे. अहवाल तयार झाला असून, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी मंजुरी दिल्यानंतर याबाबतचा अहवाल न्यायालयाकडे सादर केला जाणार आहे.(प्रतिनिधी)