नारायणगावात १७ तासांनंतर मिरवणूक सांगता

By Admin | Updated: September 29, 2015 02:21 IST2015-09-29T02:21:01+5:302015-09-29T02:21:01+5:30

‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ या गजरात नारायणगाव व वारुळवाडी शहरातील ४३ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी गुलालाचा वापर न करता फुलांची उधळण करत

After 17 hours in Narayanagar, procurement is done | नारायणगावात १७ तासांनंतर मिरवणूक सांगता

नारायणगावात १७ तासांनंतर मिरवणूक सांगता

नारायणगाव : ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ या गजरात नारायणगाव व वारुळवाडी शहरातील ४३ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी गुलालाचा वापर न करता फुलांची उधळण करत शांततेत गणरायाला भावपूर्ण निरोप दिला. गणपती विसर्जनासाठी १७ तासांचा कालावधी लागला.
यंदाच्या वर्षी बहुतांशी गणेशोत्सव मंडळांनी मिरवणुकीत ढोल, ताशा, लेझीम, टाळ-मृदंगाच्या पथकाचा समावेश केला होता. मिरवणुकीत शेतकऱ्यांची आत्महत्या, पाणी अडवा पाणी जिरवा, अब्दुल कलाम यांना श्रद्धांजली, अशा ज्वलंत व सामाजिक देखाव्यांचे सादरीकरण करण्यात आले होते. या वर्षी मिरवणुकीमध्ये महिलांचा समावेश मोठ्या प्रमाणात होता. त्याचप्रमाणे महिलांनी आपल्या कलागुणांचे सादरीकरण या मिरवणुकीत केले होते. सर्वांत प्रथम सकाळी ११ वा. खोडद रोड येथील आदर्श मित्र मंडळाने मिरवणुकीस सुरुवात केली. फुलांची सजावट करून शिस्तबद्धरीत्या मिरवणूक काढून पहिले, तर वारूळवाडी येथील नवशक्ती मित्र मंडळाने शेवटचे मध्यरात्री २ वा. विसर्जन केले.
महासूर्योदय मित्र मंडळाने पालखीतून मिरवणूक काढून गणपतीचे विसर्जन केले. पाटेआळीमधील विरोबा मित्र मंडळाने अतिशय लयबद्ध व विविध सुरांच्या ठेक्यात ढोल व ताशाच्या गजरात दुपारी ३ वा. विसर्जन केले.
पाटे-खैरे मळ्यातील शिवझुंजार मित्र मंडळाची गरुडावरील गणपतीची आकर्षक मूर्ती होती. विटे-कोऱ्हाळे मळ्यातील श्री मुक्ताबाई युवक मंडळाने झांज पथकाने ढोल व ताश्याचे सादरीकरण करत झांज पथकाने पर्यावरण वाचवा यावर पथनाट्य करीत संदेश दिला. शिवविहार गणेश मंडळाने यंदाच्या वर्षी झांज पथकाने ढोल व ताशाचे सादरीकरण चांगले केले. हनुमान मित्र मंडळाने नारायणगावच्या महाराजाची १२ फुटी नंदीवरील विराजमान मूर्तीची मिरवणूक काढून झांज पथक व तलवार बाजी, काठी, दानपट्टा अशा विविध मर्दानी खेळांचे सादरीकरण केले. या मंडळाच्या मिरवणुकीत युवती व महिलांचा विषेश सहभाग होता. भैरवनाथ गणेश मंडळ औटी मळ्याने कमळावरील फिरता गणपती हा देखावा सादर केला.
वारुळवाडी येथील भागेश्वर मित्र मंडळाने सध्या पद्धतीने गणपती विसर्जन केले व देखाव्याचा खर्च गरीब विद्यार्थ्यांंना शालेय मदत व नुकताच मागील आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसाने वारूळवाडी येथील सखूबाई गुणवंत या महिलेचे घर पडलेले होते. त्यांना आर्थिक मदत दिली. नवशक्ती मित्र मंडळाने दिवंगत राष्ट्रपती अब्दुल कलाम यांना श्रद्धांजली हा देखावा सदर केला.
वारुळवाडी सिद्धिविनायक फेज-१ मधील गणेशोत्सव मंडळाने फुलांची सजावट करून शिस्तबद्धरीत्या मिरवणूक काढली. या मिरवणुकीत महिलांचा मोठा सहभाग होता. वारुळवाडी संस्कृती फेज-३ मधील गणेशोत्सव मंडळाने फुलांची सजावट करून ढोलताशांच्या गजरात शिस्तबद्धरीत्या मिरवणूक काढली.
नारायणगाव पोलीस ठाण्याच्या वतीने सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र थोरात यांनी गणेशोत्सवासाठी ४ पोलीस उपनिरीक्षक, २० होमगार्ड, २० पोलीस कर्मचारी, १२ राखीव दल, असा बंदोबस्तसाठी स्टाफ तैनात ठेवला होता. सर्व गणपतींचे मीना नदीचे पात्रात विसर्जन करण्यात आले. देखावे पाहण्यासाठी नागरिकांची विशेष महिलांची मोठी गर्दी झाली होती. अनेक गणेशभक्त परिसर व बाहेरगावाहून मिरवणूक पाहण्यासाठी आले होते.
खंडोबा मित्र मंडळाच्या वतीने स्वागतकक्ष उभारून प्रत्येक मंडळाचा सन्मान मंडळाचे अध्यक्ष किशोर खैरे, संतोष खैरे,तिवारी, संजय अडसरे आदींनी केला. नारायणगाव ज्येष्ठ नागरिकांच्या वतीने शिवाजी चौकात स्वागतकक्ष उभारून सर्व मंडळांचा सत्कार करण्यात आला. नारायणगाव पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या २० गावांमध्ये शांततेत विसर्जन करण्यात आले. कोठेही अनुचित प्रकार घडला नाही.
यंदाच्या वर्षी पावसाअभावी दुष्काळ पडल्याने गणेशोत्सव मंडळांनी देखाव्यांना फाटा देऊन सार्वजनिक उपक्रम राबविण्याचा निर्णय
घेतल्याने या वर्षी देखावे कमी प्रमाणात होते.
(वार्ताहर)

Web Title: After 17 hours in Narayanagar, procurement is done

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.