लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे, : ‘आपली मातृभाषा जतन करण्यासाठी सर्व पातळ्यांवर प्रयत्न होणे गरजेचे आहे. याकरिता वकिलांनी न्यायालयात पक्षकारांना समजेल, अशा भाषेत आपले म्हणणे मांडावे. अभिजात सौंदर्य असलेली मराठी न्यायालयातही असणे गरजेचे आहे,’’ असे मत ज्येष्ठ विधिज्ञ डॉ. सुधाकर आव्हाड यांनी व्यक्त केले.
कौटुंबिक न्यायालयात ‘मराठी संवर्धन पंधरवडा’निमित्त आयोजित केलेल्या व्याख्यानात ते बोलत होते. न्यायालयाचे प्रमुख न्यायाधीश सुभाष काफरे, न्यायाधीश गिरीश भालचंद्र, हितेश गणात्रा या वेळी उपस्थित होते.
ॲड. आव्हाड म्हणाले, ‘जागतिक ज्ञानासाठी इतर भाषा येणे गरजेचे असले, तरी मराठी ही आपली प्रथम भाषा असावी. केवळ इंग्रजी येत नाही म्हणून कोणीही न्यूनगंड बाळगू नये. चीन, जपान, रशिया देशांचे प्रतिनिधी कोणत्याही आंतरराष्ट्रीय चर्चासत्रात स्वतःच्या भाषेत विचार मांडतात. पक्षकारांना त्यांच्या मातृभाषेत न्यायालयीन कामकाज करता आले, तर त्यांना आपले विचार योग्य पद्धतीने व्यक्त करता येतील.
न्यायाधीश एन. आर. नाईकवडे यांनी मराठीमधील न्यायनिर्णयाला उच्च न्यायालयानेही पाठिंबा दिल्याचा दाखला देत, मराठी व्याकरण कसे वापरायचे, याबाबत माहिती दिली.
दि पुणे फॅमिली कोर्ट लॉयर्स असोसिएशनच्या अध्यक्षा वैशाली चांदणे म्हणाल्या, की हॉटेलमध्ये गेलो तरी आपण हिंदी बोलण्यास सुरवात करतो. आपल्या मातृभाषेचा आदर आपणच ठेवायला हवा.
न्यायालयातील समुपदेशक नूरजहाँ मूलवाड यांनी सूत्रसंचालन केले. प्रास्ताविक समुपदेशक राणी दाते यांनी केले. तर समुपदेशक शैलेंद्र शिंदे यांनी आभार मानले.