चित्रबलाक पक्ष्यांचे आगमन
By Admin | Updated: January 6, 2015 23:10 IST2015-01-06T23:10:01+5:302015-01-06T23:10:01+5:30
भादलवाडी (ता. इंदापूर) येथील ब्रिटिशकालीन तलाव चित्रबलाक पक्ष्यांसह इतर पक्ष्यांचे झालेले आगमनामुळे गजबजून गेला आहे.

चित्रबलाक पक्ष्यांचे आगमन
पळसदेव : भादलवाडी (ता. इंदापूर) येथील ब्रिटिशकालीन तलाव चित्रबलाक पक्ष्यांसह इतर पक्ष्यांचे झालेले आगमनामुळे गजबजून गेला आहे. तलावामधील बाभळीच्या झाडांवर या पक्ष्यांनी आपले वास्तव्य केले आहे. पाण्याची परिस्थिती चांगली असतानासुद्धा पक्ष्यांची संख्या मात्र यंदा कमी असल्याचे जाणवते. तरीपण पक्षी पाहण्यासाठी पर्यटक, पक्षिप्रेमी तलाव परिसरात गर्दी करीत आहेत.
भादलवाडी येथील तलाव हा ‘चित्रबलाक’ पक्ष्यांची सर्वांत मोठी वसाहत किंवा सारंगगार होय. या ठिकाणी चित्रबलाक, ग्रेहरॉन, दर्वीमुख, स्पूनबिल, करकोचे, शेकोटी, बगळे, बदक, खंड्या या प्रमुख पक्ष्यांसह इतर जातींच्याही पक्ष्यांचे वास्तव्य आहे. त्यामुळे पक्षी निरीक्षणाच्या दृष्टीने हा तलाव पक्षिप्रेमींचे केंद्रबिंदू ठरला आहे. मात्र, एवढी मोठी नैसर्गिक रचना असतानासुद्धा पक्षी संवर्धनासाठी शासकीय पातळीवर प्रयत्न होताना दिसत नाहीत.
अनेक अधिकारी, नेते मंडळी येतात. पक्षी पर्यटनाचा आनंद लुटतात. पर्यटनाच्या दृष्टीने निधी उपलब्ध करून देऊ, असे आश्वासन देतात. परंतु, या पलीकडे काहीच होताना दिसत नाही. यंदाच्या विणीच्या हंगामासाठीही चित्रबलाक पक्ष्यांनी गर्दी केली आहे. बाभळीच्या झाडांवर अनेक पक्षी घरटी बांधताना दिसतात. तसेच, या पक्ष्यांचा किलबिलाट जाणवतो.
सर्वांत मोठे हे सारंगगार इंटरनेटच्या माध्यमातून जगाच्या नकाशावर पोहोचले. पक्षी पाहण्यासाठी अनेक पर्यटक, पक्षिप्रेमी, पक्षिमित्र या ठिकाणी येत आहेत. मात्र, पाणी असल्याने जवळून पक्षी पाहण्याचा आनंद घेता येत नाही.
वास्तविक पाहता, जलसंपदा किंवा वनविभागाने या ठिकाणी होडीची व्यवस्था करणे गरजेचे आहे. मात्र, या दोन्ही विभागाचे अधिकारी किंवा कर्मचारी या ठिकाणी साधे फिरकतानासुद्धा दिसत नाहीत.
४चित्रबलाक पक्ष्यांच्या हवेमध्ये विहंगमन करताना त्यांच्या कवायती नेत्रदीपक दिसत आहेत. तसेच, इतर विविध जातींच्या पक्ष्यांच्याही छबी टिपताना पर्यटक दिसतात. सर्वांत रेखीव पक्षी म्हणजे - चित्रबलाक उंच मान, गुलाबी चोच, रंगीबेरंगी पंख, आकाशामध्ये फिरताना तयार केलेला ‘व्ही’ आकार यामुळे तलाव परिसर पक्ष्यांनी बहरून गेला आहे. मुबलक खाद्यान्न, भरपूर पाणी, पाणथळ जागा व सुरक्षित ठिकाण यांमुळे पक्षी या ठिकाणी गर्दी करतात.
पक्षीपर्यटनासाठी सुविधा उपलब्ध होणे गरजेचे
४पक्षी टेहळणीसाठी मनोरे उभारण्याची गरज आहे. तसेच, पक्ष्यांचे जवळून निरीक्षण करण्यासाठी तलावामध्ये जाण्यासाठी होडी अथवा बोट उपलब्ध करून देण्याची मागणी आहे. पक्ष्यांची माहिती देण्यासाठी एक गाईड म्हणून रोजगार युवकांना उपलब्ध होईल. त्यासाठी तलावामध्ये सतत भरपूर पाणीसाठा असणे गरजेचे आहे. त्यानंतर हा परिसर पक्षी पर्यटनस्थळ म्हणून आणखी नावारूपाला येईल.