थंडीमुळे रब्बी पिकांना होतोय फायदा
By Admin | Updated: January 7, 2015 22:59 IST2015-01-07T22:59:48+5:302015-01-07T22:59:48+5:30
जुन्नर तालुक्यात कडाक्याची थंडी रब्बी हंगामातील पिकांना पोषक ठरत असून, थंडीमुळे रब्बीतील पिकांचे उत्पादन वाढणार आहे.

थंडीमुळे रब्बी पिकांना होतोय फायदा
ओझर : जुन्नर तालुक्यात कडाक्याची थंडी रब्बी हंगामातील पिकांना पोषक ठरत असून, थंडीमुळे रब्बीतील पिकांचे उत्पादन वाढणार आहे. या हंगामातील गहू, हरभरे या पिकांना थंडीचा मोठ्या प्रमाणात फायदा होत असून, थंडीमुळे रोगांचा प्रादुर्भाव कमी प्रमाणात होत आहे. या पिकांना थंडी आवश्यक असते. तालुक्यात पाच हजार पाचशे हेक्टर क्षेत्रावर कांदा पीक घेण्यात आले असून, तीन हजार सहाशे हेक्टर क्षेत्रावर गहू तर १७०० हेक्टरवर हरभऱ्याची पेरणी झाली आहे.
शेतकरी नगदी पीक म्हणून या पिकाचे उत्पादन घेत आहे. कांदा पिकाचे उत्पादन चांगल्या पद्धतीने निघाल्यास व बाजारभावाची साथ मिळाल्यामुळे लागवडीची उड्डाणे शेतकरी घेत आहे. गतवर्षी कांद्याचे उत्पादन चांगले निघाले होते. परंतु योग्य बाजारभाव न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांचे कांदे बराकीतच सडले होते. थोड्याफार लोकांना कांद्याचे पैसे हातात आले. एक एकर कांद्यासाठी सुमारे ७० ते ८० हजार रुपये भांडवली खर्च येतो. एवढे भांडवल घातल्यानंतर १० ते १५ टन उत्पादन हातात येते. एप्रिल महिना कांदा काढणीनंतर बहुतांश शेतकरी कांदा साठवणगृहात साठवून ठेवतात. आॅक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात कांद्याचे दर चांगले राहतात. त्यामुळे शेतकरी कांदा या महिन्यापर्यंंत साठवून ठेवतात. सहा महिने कांदा साठवणगृहात राहिल्यानंतर वजन घट व सड होत असल्यामुळे आठ ते दहा टन उत्पादन शेवटी हातात येते. चांगले बाजारभाव मिळाले, तर शेतकऱ्याला कांदा पीक तारते. थंडीमुळे सध्या कांदा पीक जोमात असून, थंडीचे सातत्य राहिल्यास कांदा पिकाचे चांगले उत्पादन हातात येण्याच्या अपेक्षेने शेतकरी कांद्याला भांडवली खर्च करीत आहे.
बाजारभावाचे गणित शेतकऱ्याच्या हातात नसल्यामुळे चांगले उत्पादन निघाले तरी उत्पन्नाची शाश्वती नसल्यामुळे शेती व्यवसाय दिवसेंदिवस जुगारीचा होत चालला आहे.
शेतकरीवर्ग शेती पिकासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करीत आहे. शेतमालाला हमी बाजारभाव नसल्यामुळे शेतीचे सततच आत बट्ट्याचे अर्थ कारण शेतकरीवर्गाला सोसावे लागत आहे. (वार्ताहर)
४योग्य बाजारभाव न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांचे कांदे बराकीतच सडले होते. थोड्याफार लोकांना कांद्याचे पैसे हातात आले. एक एकर कांद्यासाठी सुमारे ७० ते ८० हजार रुपये भांडवली खर्च येतो. एवढे भांडवल घातल्यानंतर १० ते १५ टन उत्पादन हातात येते.