वाघोलीतील जमिनीबाबत गेनबा सोपानराव मोझे ट्रस्टचा अर्ज प्रशासनाने फेटाळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2021 04:09 IST2021-04-14T04:09:09+5:302021-04-14T04:09:09+5:30
वाघोली : वाघोली (ता.हवेली) येथील गेनबा सोपानराव मोझे ट्रस्टला शैक्षणिक प्रयोजनार्थ वाघोली येथे देण्यात आलेल्या जमिनीचा भोगवटा वर्ग २ ...

वाघोलीतील जमिनीबाबत गेनबा सोपानराव मोझे ट्रस्टचा अर्ज प्रशासनाने फेटाळला
वाघोली : वाघोली (ता.हवेली) येथील गेनबा सोपानराव मोझे ट्रस्टला शैक्षणिक प्रयोजनार्थ वाघोली येथे देण्यात आलेल्या जमिनीचा भोगवटा वर्ग २ चे २०१९ च्या शासन आदेशानुसार भोगवटा वर्ग १ (म्हणजेच बिनदुमाला जमीन म्हणजेच इनाम नसलेली जमीन, कायमस्वरूपी व हस्तांतरण करताना कोणाच्याही पूर्वपरवानगीची गरज नसलेली जमीन) मध्ये करण्याबाबत दिलेला ट्रस्टचा अर्ज जिल्हा प्रशासनाने फेटाळला आहे.
वाघोली येथील गट क्रमांक ११७८ मधील ४ हेक्टर ९९ आर गायरान जमीन गेनबा सोपानराव मोझे ट्रस्ट या शैक्षणिक संस्थेला शैक्षणिक व क्रीडांगण प्रयोजनार्थ मंजूर आहे. त्यानुसार सदर जागेत पार्वतीबाई गेनबा मोझे अभियांत्रिकी महाविद्यालय व गेनबा सोपानराव मोझे औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालय चालू आहे. जमीन भोगवटादार वर्ग २ म्हणून नवीन व अविभाज्य शर्तीवर नगररचना विभागाने निश्चित केलेल्या मूल्यांकनाची रक्कम संस्थेने जमा केली आहे.
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग ४ व २०१९ च्या अधिसूचनेनुसार भोगावदार वर्ग २ आणि भाडेपट्ट्याने प्रदान केलेल्या जमिनी भोगवटादार वर्ग १ मध्ये रूपांतरित करण्याच्या नियमानुसार आदेश व्हावा व त्याचे मूल्य संस्था भरण्यास तयार असल्याचा अर्ज पालकमंत्री अजित पवार यांच्याकडे करण्यात आला होता. पालकमंत्री यांच्याकडून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्राप्त अर्जाची कार्यवाही करण्यात आली. महसूल विभागाकडून करण्यात आलेल्या पूर्ततेनंतर वाघोली येथील गट नंबर ११७८ मधील जमीन शैक्षणिक प्रयोजनार्थ प्रदान करण्यात आली असल्याने शासन अधिसूचना २०१९ मधील तरतुदी शैक्षणिक प्रयोजनास लागू होत नसल्याने अर्ज जिल्हा प्रशासनाने फेटाळला आहे.
******************
प्रतिक्रिया
गेनबा सोपानराव मोझे ट्रस्टला दिलेली जागा शर्तभंग खाली शासन जमा व्हावी तसे अहवाल ही वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविले आहेत. सदरची जागा हि जिल्हा न्यायालयाला देण्यात यावी
किशोर सातव, माहिती अधिकार कार्यकर्ते