नगरसेवकांच्या प्रश्नांनी प्रशासनाची भंबेरी
By Admin | Updated: October 29, 2015 00:12 IST2015-10-29T00:12:20+5:302015-10-29T00:12:20+5:30
महापालिकेच्या मुख्यसभेत महापौर दत्तात्रय धनकवडे यांनी अनेक दिवसांनी प्रश्नोत्तरे घेण्यास परवानगी दिल्यानंतर सभासदांनी अभ्यासपूर्ण रीतीने प्रश्नांचा मारा प्रशासनावर केल्याने अधिकाऱ्यांची भंबेरी उडाली

नगरसेवकांच्या प्रश्नांनी प्रशासनाची भंबेरी
पुणे : महापालिकेच्या मुख्यसभेत महापौर दत्तात्रय धनकवडे यांनी अनेक दिवसांनी प्रश्नोत्तरे घेण्यास परवानगी दिल्यानंतर सभासदांनी अभ्यासपूर्ण रीतीने प्रश्नांचा मारा प्रशासनावर केल्याने अधिकाऱ्यांची भंबेरी उडाली. सभासदांनी नियमावर बोट, मिळालेल्या अधिकारांचा वापर करून प्रशासनाला धारेवर धरले. अधिकाऱ्यांना प्रश्नांची व्यवस्थित उत्तरे देता न आल्याने प्रश्न राखून ठेवण्याचे आदेश महापौरांनी बुधवारी दिले.
महापालिकेची मुख्यसभा दर महिन्याला घेतली जाते. सभासदांकडून शहराच्या महत्त्वाच्या प्रश्नांवर प्रश्नोत्तरांतर्गत माहिती मागविली जाते. गेल्या दीड वर्षांत मुख्य सभेमध्ये ९९ प्रश्न सभासदांनी विचारले; मात्र त्यापैकी केवळ ५ प्रश्नांवरच कामकाज झाल्याने मनसेच्या सभासदांनी राजदंड पळवीत गोंधळ घातला होता. यापार्श्वभूमीवर बुधवारी आॅक्टोबर महिन्याची मुख्यसभा सुरू होताच महापौरांनी प्रश्नोत्तरे पुकारण्याचे आदेश दिले.
नगरसेविका सुशीला नेटके यांच्या प्रश्नाने सभेच्या कामकाजाची सुरुवात झाली. प्रभाग क्रमांक ५९ मधील पीएमसी कर्मचाऱ्यांच्या कॉलनीचे काम कधी पूर्ण होऊन त्यांना घराचा ताबा मिळणार, याची विचारणा केली. मात्र, भवन विभागाच्या अधिकाऱ्यांना त्यावर समाधानकारक उत्तर देता आले नाही. त्यामुळे महापौरांच्या दालनात यावर बैठक घेण्याचा निर्णय झाला.
शहरामध्ये किती झोपडपटट््या आहेत. त्यापैकी किती ठिकाणी एसआरएची स्किम करण्यात आली आहे. याबाबतचा प्रश्न योगेश मोकाटे यांनी विचारला होता. मालमत्ता विभागाचे प्रमुख सतीश कुलकर्णी यांना उत्तर देण्यास आयुक्तांनी सांगितले. मात्र, हा विषय एसआरएशी संबंधित असल्याने त्यावर सविस्तर माहिती देण्यास कुलकर्णी यांनी असमर्थता दर्शविली.
महापालिकेने एसआरएसाठी १८०० रूपयांचे मुल्य अदा केला आहे, त्याबदल्यात महापालिकेला किती सदनिका मिळाल्या व किती लाभार्थ्यांना लाभ मिळाला याची विचारणा उपमहापौर आबा बागूल यांनी केली.
शहरअभियंता प्रशांत वाघमारे यांना याबाबतची माहिती देता आली नाही. त्यावेळी त्यांना नियमावली वाचून दाखविण्यास बागूल यांनी सांगितले. प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी वाघमारे यांनी वेळ मागून घेतल्याने महापौरांनी हा प्रश्न राखून ठेवला.
प्रशासनाच्या या निष्काळजीपणावर सभासदांनी कठोर शब्दात टिका केली. प्रश्नोत्तरासाठी अधिकाऱ्यांनी तयारी करून यायला हवी, अभ्यास करायला हवा अशी भावना पृथ्वीराज सुतार, धनंजय जाधव यांनी व्यक्त
केली. (प्रतिनिधी)
बुधवारी एकाच दिवशी महापालिकेमध्ये ७ मुख्य सभांचे आयोजन करण्यात आले होते. या सभांमध्ये सभासदांनी कुत्रा, मूर्ख, डोक्यात काठी, दगड घालू का, असे शब्दप्रयोग केल्याने सभागृहाच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचून मान खाली गेली. हे असंसदीय शब्दप्रयोग सभागृहातून काढून टाकण्याचे आदेश महापौरांनी दिले. हरियाणा इथे घडलेल्या दलित अत्याचाराच्या घटनेबाबात केंद्रीय मंत्री व्ही. के. सिंग यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी काँग्रेसच्या वतीने सभेच्या कामकाजाची तहकुबी मांडण्यात आली. त्या वेळी त्याचा निषेध करण्यासाठी भाजपाचे गटनेते गणेश बिडकर यांच्या नेतृत्वाखाली भाजपाचे सभासद महापौरांच्या समोरील मोकळ्या जागेत गोळा झाले. त्या वेळी बिडकर यांनी सभासदांना उद्देशून कुत्रा हा शब्द वापरल्याने सभागृहात मोठा गोंधळ झाला. बिडकर यांच्या वक्तव्याचा सभागृहाने तीव्र शब्दांमध्ये निषेध केला. सभागृहनेते बंडू केमसे यांनी मनसेच्या गटनेत्यांना उद्देशून मुर्खाची लक्षणे सांगितली. त्यावर मनसेचे सभासद आक्रमक झाले. मनसेचे गटनेते बाबू वागस्कर यांनी त्याला उत्तर देताना सभागृहनेत्यांना उद्देशून तुमच्यासारख्या नाठाळाच्या डोक्यात आम्ही काठी, दगड घालायची का? असा प्रश्न केला.
भोंगळ कारभार
उपमहापौर आबा बागूल यांनी एसआरए संदर्भात विचारलेल्या प्रश्नावर प्रशासनाला उत्तर देता न आल्याने त्यांनी तीव्र शब्दांत आपली नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, ‘‘सगळा भोंगळ कारभार सुरू आहे. कोणाला काही माहिती नाही, एक उत्तर कोणी देऊ शकत नाही. महापालिका अशी चालली, तर दिवाळखोर म्हणून जाहीर करावी लागेल. प्रशासनाची अकार्यक्षता यातून स्पष्ट होते. साडेतीन वर्षांत प्रश्नोत्तरे घेतली गेली नाहीत म्हणून ही परिस्थिती उद्भवली आहे.’’ ठेकेदारास १३ लाख रुपयांचा दंड
पीएमसी कॉलनीचे काम ठेकेदाराने दोन वर्षांत पूर्ण करणे आवश्यक होते. त्याने वेळेत काम पूर्ण न केल्याने त्याला दिवसाला एक हजार रूपये याप्रमाणे १३ लाख २० हजार ७५० रूपये दंड आकारण्यात आला आहे. येत्या २ महिन्यांत काम पूर्ण होऊन महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना घराचा ताबा दिला जाईल, अशी माहिती भवन विभागाचे प्रमुख राजेंद्र राऊत यांनी दिली.