उन्हाळी सुटीनिमित्त जादा एसटी
By Admin | Updated: March 28, 2016 03:23 IST2016-03-28T03:23:08+5:302016-03-28T03:23:08+5:30
उन्हाळी हंगामानिमित्त पिंपरी-चिंचवडच्या वल्लभनगर एसटी आगारातून जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत. गाणगापूर व वांगी या भागात जाण्यासाठी गाड्या सुरू केल्या आहेत.
उन्हाळी सुटीनिमित्त जादा एसटी
पिंपरी : उन्हाळी हंगामानिमित्त पिंपरी-चिंचवडच्या वल्लभनगर एसटी आगारातून जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत. गाणगापूर व वांगी या भागात जाण्यासाठी गाड्या सुरू केल्या आहेत. बीड, त्र्यंबकेश्वर, उमरगा, धुळे व सासुर या भागातील जादा गाड्या १ एप्रिलपासून आरक्षणासाठी सोडण्यात येणार असल्याची माहिती आगारप्रमुख अनिल भिसे यांनी दिली आहे.
पिंपरी-चिंचवडमधील प्रवाशांकरिता वल्लभनगर आगारामार्फत पिंपरी-चिंचवड-निगडी ते गाणगापूर ही गाडी जेजुरी-नीरा-फलटण-पंढरपूर-मंगळवेढा या मार्गावरून जाणार आहे. ही गाडी सायंकाळी सहा वाजता निघून दुसऱ्या दिवशी सकाळी पाच वाजता गाणगापूरला पोहोचेल. दुसऱ्या दिवशी सकाळी सात वाजता गाणगापूरहून पिंपरी-चिंचवडला याच मार्गाने ही गाडी परत येईल. सध्या सकाळी गाणगापूरला जाण्यासाठी आगाराची एक गाडी आहे. आता प्रवाशांच्या सोयीसाठी या मार्गावर एक जादा गाडी सोडण्यात आली आहे. दुपारी दीड वाजता सांगली येथील वांगी गावासाठी गाडी सुरू करण्यात आली आहे. ही गाडी सातारा-कराडमार्गे जाईल. सायंकाळी साडेसातला वांगी येथे पोहोचेल. वांगीवरून दुसऱ्या दिवशी सकाळी ६.१५ला ही गाडी परत फिरेल आणि मध्यरात्री साडेबाराला आगारात पोहोचेल. या दोन्ही गाड्यांच्या फेऱ्या मुक्कामी आहेत. याशिवाय
सकाळी ६.१५ला बीड, ७.४५ला सासुर, १० ला धुळे, ११ ला
त्र्यंबकेश्वर व रात्री ९.३०ला उमरगा या भागातही जादा गाड्या सोडण्याचे नियोजन आहे. या गाड्यांचे एक एप्रिलपासून आरक्षण सुरू करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)
पिंपरी-चिंचवडच्या प्रवाशांसाठी गाणगापूर व वांगी या भागात जाण्यासाठी गाड्या सुरू करण्यात आल्या आहेत. या गाड्यांच्या फेऱ्या मुक्कामी आहेत. याशिवाय बीड, त्र्यंबकेश्वर, उमरगा, धुळे, सासुर या भागासाठीही सोडण्यात येणाऱ्या गाड्यांचे एक एप्रिलपासून आरक्षण सुरू करण्यात येणार आहे.
- अनिल भिसे, आगारप्रमुख
पिंपरी-चिंचवड एसटी आगार