अतिरिक्त सरकारी वकील पाच महिन्यांपासून मानधनाविना
By Admin | Updated: March 22, 2017 03:30 IST2017-03-22T03:30:37+5:302017-03-22T03:30:37+5:30
पुणे जिल्हा न्यायालयासाठी नियुक्त करण्यात आलेल्या अतिरिक्त सरकारी वकिलांना ५ महिने मानधन देण्यात आलेले नाही.

अतिरिक्त सरकारी वकील पाच महिन्यांपासून मानधनाविना
पुणे : पुणे जिल्हा न्यायालयासाठी नियुक्त करण्यात आलेल्या अतिरिक्त सरकारी वकिलांना ५ महिने मानधन देण्यात आलेले नाही. वाढत्या गुन्ह्यांचे प्रमाण लक्षात घेता शिक्षेचे प्रमाण सरकारी वकिलांकडून वाढावे अशी अपेक्षा एका बाजूला व्यक्त करण्यात येते आहे. तर दुसऱ्या बाजूला त्यांच्या मानधनाकडे दुर्लक्ष केले जाते आहे.
पुणे जिल्हा न्यायालयात ३३ ते ३५ अतिरिक्त सरकारी वकील सध्या कार्यरत आहेत. राज्य सरकारकडून या अतिरिक्त सरकारी वकिलांची मानधनावर नियुक्ती करण्यात येते. जून २०१६ मध्ये नियुक्त करण्यात आलेल्या अतिरिक्त सरकारी वकिलांना सुरुवातीला वेळेवर मानधन देण्यात आले. मात्र त्यानंतर गेल्या ५ महिन्यांपासून सरकारी वकिलांना मानधन देण्यात आलेला नाही. मानधनावर नियुक्त करण्यात आलेल्या या वकिलांना त्यांच्याकडून हाताळण्यात येणाऱ्या केसेस आणि दैनंदिन कामाचा अहवाल दरमहिन्याला सादर करावा लागतो. त्यानुसार त्यांना मानधन देण्यात येते़
(प्रतिनिधी)