अतिरिक्त आयुक्तांचा कारवाईचा धडाका कायम

By Admin | Updated: January 17, 2015 00:06 IST2015-01-17T00:06:54+5:302015-01-17T00:06:54+5:30

गैरव्यवहार करणा-या ठेकेदारांविरुद्ध कारवाई करणारे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांच्या बदलीला सर्व स्तरांतून

The Additional Commissioner's crackdown continued | अतिरिक्त आयुक्तांचा कारवाईचा धडाका कायम

अतिरिक्त आयुक्तांचा कारवाईचा धडाका कायम

पुणे : गैरव्यवहार करणा-या ठेकेदारांविरुद्ध कारवाई करणारे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांच्या बदलीला सर्व स्तरांतून विरोध झाल्यानंतर त्यांच्याकडील अतिरिक्त आयुक्त पदाचा कार्यभार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कायम ठेवला. या पार्श्वभूमीवर गैरव्यवहार करणाऱ्या ठेकेदारांबाबत कोणतीही नरमाईची भूमिका न घेता त्यांच्याविरुद्ध फौजदारी कारवाई करण्याचे संकेत प्रशासनाकडून देण्यात आले आहेत.
पालिकेकडून ठेकेदार नितीन वरघडे याने २०४ कोटींच्या ४० कामांचा ठेका मिळविला होता. त्याने शहरात विविध ठिकाणी केलेली विकासकामे निकृष्ट दर्जाची असतानाही पालिका प्रशासनाकडून त्या कामांची बिले अदा करण्यात आली असल्याचा आरोप मुख्य सभेत सदस्यांकडून करण्यात आला होता. त्यानंतर बकोरिया यांनी वरघडेने केलेल्या ३२ विकासकामांची चौकशी केली होती. त्यातील १२ कामे व बिले यात प्रचंड तफावत असल्याचे आढळले होते. त्यानंतर वरघडे याला काळ्या यादीत टाकण्याची कारवाई सुरू करण्यात आली होती.
ठेकेदाराशी संबंधित एका आमदाराने त्यानंतर बकोरिया यांच्या बदलीसाठी फिल्डिंग लावली होती. त्यात संबंधितांना यशही आले. मात्र, बकोरियांच्या बदलीला सर्वच स्तरातून विरोध झाला. या पार्श्वभूमीवर त्यांच्याकडील अतिरिक्त आयुक्तपदाचा कार्यभार कायम ठेवण्यात आला आहे. ठेकेदारावरील कारवाईमुळे बदलीचा प्रकार घडला असतानाही ठेकेदारावरील कारवाईमध्ये कोणतीही नरमाई येणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार गेल्या सात वर्षांमध्ये केलेल्या सर्व कामांची तपासणी सुरू केली आहे. चौकशीमध्ये वरघडे याच्याकडून पालिकेची आर्थिक फसवणूक झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे त्याच्यावर फौजदारी कारवाई करण्याचे संकेतही प्रशासनाकडून देण्यात आले आहेत. यानंतर प्रशासनाने इतर ठेकेदारांनी एका वर्षात केलेल्या १०३ कामांची चौकशी केली होती. त्यामध्ये केवळ ३ कामे निकृष्ट असल्याचे आढळून आले आहे. वरघडेच्या ३२ कामांच्या तपासणीमध्ये १२ कामे निकृष्ट दर्जाची असल्याचे चौकशीमध्ये निष्पन्न
झाले आहे.(प्रतिनिधी)

Web Title: The Additional Commissioner's crackdown continued

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.