कार्यकर्त्यांनी लोकांसाठी मदत केंद्र म्हणून काम करावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:17 IST2021-02-23T04:17:09+5:302021-02-23T04:17:09+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : “ कोणत्याही शहरात रस्ते, पाणी, दिवे, पार्किंग असे प्रश्न असतात. चांगले रस्ते, बसची संख्या ...

कार्यकर्त्यांनी लोकांसाठी मदत केंद्र म्हणून काम करावे
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : “ कोणत्याही शहरात रस्ते, पाणी, दिवे, पार्किंग असे प्रश्न असतात. चांगले रस्ते, बसची संख्या वाढविणे, मार्ग वाढविणे, उड्डाणपूल अशा सुविधा देणे आवश्यक असते. लोकांशी थेट संपर्कही महत्त्वाचा असतो. अनेकांच्या घरात मुलांची फी भरायला पैसे नसणे, घरी एकटेच असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना मदत या गोष्टी करता येतील. याकरिता कार्यकर्त्यांनी लोकांसाठी मदत केंद्र म्हणून काम करावे,” असे मत भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले.
भाजपाचे शहर उपाध्यक्ष सुनील पांडे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन पाटील यांच्या उपस्थितीत भांडारकर रस्त्यावर सोमवारी (दि. २२) झाले. त्यावेळी ते बोलत होते. खासदार गिरीश बापट, आमदार सिद्धार्थ शिरोळे, महापौर मुरलीधर मोहोळ, उपमहापौर सरस्वती शेंडगे, दत्तात्रय खाडे, नगरसेविका ज्योत्स्ना एकबोटे आणि सुनील पांडे आदी यावेळी उपस्थित होते.
चंद्रकांत पाटील म्हणाले की, ‘माणूस आपला आहे’ असे वाटण्याची सुरुवात जनसंपर्क कार्यालयापासून होते. कार्यालय सुरु झाल्यावर कार्याचा ओघ वाढतो. नागरी समस्या सोडविण्याचा प्रयत्न करा. लोकांना आवश्यक त्या सुविधा द्यायला हव्या. यामुळे लोक जोडले जातात, असेही त्यांनी सांगितले. गिरीश बापट म्हणाले, “नागरिक खूप आशेने भाजपाकडे पाहत आहेत. पूर्वी भाजपचे २-३ खासदार असायचे. आता संख्या तीनशेपार झाली. आगामी काळात ही संख्या आणखी वाढवायची आहे.” नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी हे कार्यालय सतत खुले राहणार असल्याची ग्वाही पांडे यांनी दिली. शिरोळे यांनी मनोगत व्यक्त केले.