बाणेरमधील जागा बळकावल्याप्रकरणी कारवाई क रा
By Admin | Updated: April 11, 2015 05:23 IST2015-04-11T05:23:17+5:302015-04-11T05:23:17+5:30
बाणेरमधील महापालिकेच्या मालकीची पाण्याची टाकी परस्पर पाडून पावणेदोन गुंठे जागा शेजारच्या जागामालकांनी बळकाविल्याच्या प्रकरणाची चौकशी,

बाणेरमधील जागा बळकावल्याप्रकरणी कारवाई क रा
पुणे : बाणेरमधील महापालिकेच्या मालकीची पाण्याची टाकी परस्पर पाडून पावणेदोन गुंठे जागा शेजारच्या जागामालकांनी बळकाविल्याच्या प्रकरणाची चौकशी, तपासणी तातडीने पार पाडून योग्य ती कारवाई करण्याचे आदेश स्थायी समिती व शहर सुधारणा समितीच्या शुक्रवारी झालेल्या बैठकीत प्रशासनाला देण्यात आले.
पत्रव्यवहार, नोटिसा असे कागदोपत्री घोडे नाचवत न बसता तातडीने कारवाई करण्याचे आदेश या वेळी देण्यात आले. बाणेरमधील महापालिकेच्या मालकीची जागा बळकावण्यात आल्याचे प्रकरण गुरुवारी ‘लोकमत’ने उजेडात आणले. या पार्श्वभूमीवर स्थायी समिती व शहर सुधारणा समितीच्या आज झालेल्या बैठकीत हा मुद्दा सदस्यांनी उपस्थित करून प्रशासनाकडे माहिती मागितली. पुराव्यानिशी प्रकरण उजेडात येऊनही हा विषय आमच्या खात्याशी संबंधित नाही, अशी भूमिका घेऊन जबाबदारी झटकली जात होती. त्याबाबत प्रशासनाला जाब विचारण्यात आला.
बाणेरमधील संबंधित जागेसंदर्भात संपूर्ण चौकशी करून कारवाई अहवाल सोमवारपर्यंत देण्याचे आदेश स्थायी समितीने प्रशासनाला दिले असल्याचे स्थायी समितीच्या अध्यक्ष अश्विनी कदम यांनी सांगितले. पत्र्यव्यवहार करीत कागदी घोडे नाचवत न बसता तातडीने कारवाई करण्यास सांगण्यात आल्याचे शहर सुधारणा समितीच्या अध्यक्ष रूपाली पाटील-ठोंबरे यांनी सांगितले.
बाणेर गाव १९९७मध्ये महापालिकेत समाविष्ट झाले, त्याबरोबर ग्रामपंचायतीच्या मालकीच्या इमारती, शाळा, मोकळी जागा या महापालिकेकडे हस्तांतरित झाल्या.
त्यानुसार तुकाई मंदिराच्या पायथ्याशी असलेली पाण्याची टाकी व पावणेदोन गुंठे जागा पालिकेकडे हस्तांतरित झाली होती. मात्र, दोन महिन्यांपूर्वी ती टाकी पाडून शेजारच्या जमीनमालकांनी त्यावर अतिक्रमण केले आहे. या पाण्याचा टाकीचा वापर बंद झाल्यानंतर पाणीपुरवठा विभागाने ही जागा मालमत्ता व व्यवस्थापन विभागाकडे हस्तांतरित करणे आवश्यक होते. त्या ठिकाणी कंपाऊड टाकून महापालिकेची मालकी दर्शविणे आवश्यक असताना त्याकडे लक्ष दिले गेले नाही.