प्रा. डॉ. राजा दिक्षीत : पुणे प्रार्थना समाजाच्या वतीने १३० व्या ब्राह्मो परिषदेचे आयोजन
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : प्रार्थना समाज आणि ब्राह्मो समाज यांचा उदय हा भारतीय संस्कृतीच्या उदयाचा अविभाज्य भाग होता. ब्राह्मो आणि प्रार्थना समाजाच्या नेत्यांच्या पावलावर पाऊल ठेवत त्यांची तत्वे अंगिकारायला हवी. काळासोबत पुढे जाण्यासाठी तरुणाईला ब्राह्मो आणि प्रार्थना समाजासोबत जोडणे आवश्यक आहे. त्यासाठी कृतीभिमुख कार्यक्रम राबवावे लागतील, असे मत इतिहासतज्ज्ञ प्रा. डॉ. राजा दिक्षीत यांनी व्यक्त केले.
पुणे प्रार्थना समाजाच्या वतीने १३० व्या ब्राह्मो परिषदेचे लाईव्ह आयोजन करण्यात आले होते. पुणे प्रार्थना समाजाच्या १५० व्या वर्षानिमित्त दोन दिवसीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या ब्राह्मो परिषदेचे अध्यक्षपद ब्राह्मो समाज दिल्लीचे अध्यक्ष संजोय चंदा यांनी भूषविले. त्यांच्यासोबत फॉरेन्सिक मेडिसिन महाराष्ट्र राज्याच्या माजी अध्यक्षा डॉ. वसुधा आपटे, भांडारकर प्राच्यविद्या संशोधनाचे भूपाल पटवर्धन, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरु प्रा. डॉ. नितीन करमाळकर, सुधीर देवरे, पुणे प्रार्थना समाजाचे चिटणीस दिलीप जोग, सहचिटणीस सुषमा जोग, या परिषदेत सहभागी झाले होते.
प्रा. दिक्षीत म्हणाले, ''''''''ब्राह्मो चळवळ ही ब-याच अंशी वास्तवात उतरली आहे. तरीही तरुणांचा सहभाग वाढल्यास अनेक गोष्टी करणे शक्य आहे. यासाठी कृतीभिमुख कार्यक्रम राबवावे लागतील. महानगर ते ग्रामीण आणि आदिवासी भागातील तरुणांच्या समस्या हे धोरण विकसित करण्यात तरुणांचा सक्रिय सहभाग अत्यंत आवश्यक आहे.''''''''
दिलीप जोग म्हणाले, ''''''''पुणे प्रार्थना समाजाने मानवतावादी, समानतावादी, आध्यात्मिक, सद्वर्तन आणि वैज्ञानिक दृष्टीकोन ही पंचसूत्री स्विकारली. या पंचसूत्रीच्या सहाय्याने ज्ञानाधिष्ठित आणि मूल्याधिष्ठित समाजाची निर्मिती व्हावी यासाठी तरुणाईला ब्राह्मो आणि प्रार्थना समाजाशी कसे जोडता येईल, हा परिषदेचा मुख्य विषय आहे.'''''''' डॉ. वसुधा आपटे यांनी महादेव गोविंद रानडे यांच्याविषयी मनोगत व्यक्त केले.