अवैध माती उपशावर कारवाई
By Admin | Updated: December 26, 2016 02:45 IST2016-12-26T02:45:27+5:302016-12-26T02:45:27+5:30
बारामती व फलटण या दोन्ही तालुक्यांतील तहसीलदारांनी एकत्र येऊन रविवारी (दि. २५) पहाटे साडेचारच्यादरम्यान कोऱ्हाळे खुर्द

अवैध माती उपशावर कारवाई
वडगाव निंबाळकर : बारामती व फलटण या दोन्ही तालुक्यांतील तहसीलदारांनी एकत्र येऊन रविवारी (दि. २५) पहाटे साडेचारच्यादरम्यान कोऱ्हाळे खुर्द (ता. बारामती) येथील नीरा नदीपात्रात चाललेला अवैधरीत्या माती उपशावर कारवाई केली. यामधे दोन पोकलँड मशिन ताब्यात घेऊन वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यामध्ये लावले आहेत.
येथील नदीपात्रात असलेल्या बेटासारख्या भागावरून मातीउपसा गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. याबाबत अनेक नागरिकांनी महसूल विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रारी केल्या होत्या. याबाबतची खातरजमा होताच बारामतीचे तहसीलदार हनुमंत पाटील, नायब तहसीलदार एम. ए. भोसले, मंडल अधिकारी महेश गायकवाड, तलाठी अंकुश भगत, आशिष कदम यांच्यासोबत वडगाव निंबाळकर पोलीस, फलटण (जि. सातारा) येथील तहसीलदार विजय पाटील मंडल अधिकारी बी. पी. ढवळे यांच्यासोबत साखरवाडी (ता. फलटण) येथील पोलीस या सर्व अधिकाऱ्यांच्या टीमने पहाटे साडेचारच्यादरम्यान नदीपात्रात पाहणी केली. या वेळी अनेक वाहने मशिनच्या साह्णाने मातीउपसा करीत असल्याचे आढळून आले.
अधिकाऱ्यांची टीम आपल्या दिशेने येत असल्याचे पाहून मातीमाफियांनी आपली वाहने पळवून नेली. पोकलँड मशिनमाफियांना नेता आली नाहीत. यामुळे ती तेथेच सोडून देण्यात आली. मशिन अधिकाऱ्यांनी ताब्यात घेऊन खोदकाम केलेल्या जागेचे मोजमाप अधिकाऱ्यांनी केले आहे. नदीच्या दोन्ही बाजूंकडून सुमारे पाचशे ब्रास माती काढल्याचे प्राथमिकरीत्या दिसून येत आहे. पात्रातील सर्व ठिकाणांचे मोजमाप केले जाणार आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
हद्दीचा वाद असल्याने कारवाई करण्यास अडथळे येत होते. बारामती भागाकडून महसूल अधिकारी कारवाईसाठी गेले तर हद्दीचे
कारण सांगून माफिया अधिकाऱ्यांनाच धमकावत होते. यामुळे नदीच्या दोन्ही भागांकडून संयुक्त कारवाई होणे गरजेचे होते. यानुसार रविवारी कारवाई केली. पळून गेलेल्या वाहनांचे क्रमांक घेतले आहेत. ते बारामती
आरटीओ कार्यालयाला कळवले जाणार आहेत, असे तहसीलदार पाटील यांनी सांगितले. प्राथमिक पाहणीत दोन्ही बाजूकडून पाचशे ब्रास माती काढल्याचे दिसून आले आहे. (वार्ताहर)