पुणे : शहरामध्ये अनधिकृतपण व महापालिकेचे सर्व नियम धाब्यावर बसवत मोबाईल दुकानांच्या बाहेर सर्रास जाहिरातबाजी सुरु आहे. मोबाईल कंपन्यांनी शहरामध्ये १५२ ठिकाणी महापालिकेच्या आकाशचिन्ह विभागाची कोणतीही परवानगी न घेता बेकायदेशीरपणे जाहिराती केल्या आहेत. संबंधित कंपनीला महापालिकेकडून नोटिसा देण्यात आल्या आहेत, परंतु तीन पट दंड वसुल करण्याकडे प्रशासनाकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचे समोर आले आहे. महापालिकेच्या जाहिरात धोरण २००३ नुसार शहरामध्ये कोणत्याही प्रकारची जाहिरात करण्यापूर्वी महापालिकेच्या आकाशचिन्ह विभागाची परवानगी घेणे आवश्यक आहे. २२२ रुपये प्रति चौरस फुट शुल्क आहे. याशिवाय शहरातील सर्वच दुकानदारांना आपल्या व्यवसायाची जाहिरात करता यावी, यासाठी दुकानाच्या दर्शनी भागाच्या लांबीएवढी व ३ फूट उंचीची जाहीरात लावण्यास मुभा देण्यात आली आहे. परंतु प्रत्येक गोष्टींची महापालिकेच्या आकाशचिन्ह विभागाची परवानगी घेणे बंधनकारक आहे. सध्या शहरात विविध भागात विविध मोबाईल कंपन्यांच्या दुकानांच्या बाहेर महापालिकेच्या आकाशचिन्ह विभागाचे सर्व नियम धाब्यावर बसवत मोठ्या प्रमाणात जाहिरात केली जात आहे. जंगली महाराज रस्ता, कॅम्प परिसर, नवी पेठ, कोरेगाव पार्क परिसरातील सर्वच मोबाईल दुकानांच्या ठिकाणी नियमांचे उल्लंघन करण्यात आल्याचे समोर आले आहे.याबाबत महापालिकेच्या आकाशचिन्ह विभागाच्या वतीने सर्व मोबाईल दुकानदारांना नोाटिसा देऊन नियमानुसार जाहिरात शुल्क भरण्याचे आदेश दिले आहेत. परंतु महापालिकेच्या नोटिसांना केराची टोपली दाखवत मोबाईल दुकानदारांनी दुर्लक्ष केले. यात प्रशासनाने गुन्हे दाखल करण्यास सुरुवात केल्यानंतर अखेर मोबाईल कंपन्यांनी दुकानाबाहेर जाहीरात करण्यासाठी परवानगी घेण्यास सुरुवात केली.महापालिकेच्या वतीने शहरामध्ये मोबाईल कंपन्यांकडून करण्यात येणा-या जाहिरातींचा सर्व्हे करण्यात आला. यामध्ये ओपो कंपनीने ११७ ठिकाणी तर विवो कंपनीने २३५ ठिकाणी जाहिरात फलक लावले आहेत. यामध्ये काही ठिकाणी परवानगी घेऊन नियमानुसार जाहीरात शुल्क भरले देखील.परंतु आजही अनेक ठिकाणी विनापरवानगी जाहीरातबाजी सुरु आहे. यामध्ये विवो कंपनीचे शहरात ६८ ठिकाणी तर ओपोचे ८४ ठिकाणी अशा प्रकारे विनापरवानगी जाहीराती लावण्याचे निदर्शनास आले आहे. याबाबत नगरसेवक प्रमोद भानगिरे यांनी विचारलेल्या लेखी प्रश्नामध्ये ही माहिती समोर आली.
बेकायदेशीरपणे जाहिरातबाजी करणाऱ्या मोबाईल कंपन्यांवर कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2018 18:33 IST
महापालिकेच्या जाहिरात धोरण २००३ नुसार शहरामध्ये कोणत्याही प्रकारची जाहिरात करण्यापूर्वी महापालिकेच्या आकाशचिन्ह विभागाची परवानगी घेणे आवश्यक आहे.
बेकायदेशीरपणे जाहिरातबाजी करणाऱ्या मोबाईल कंपन्यांवर कारवाई
ठळक मुद्दे१५२ ठिकाणी विनापरवानगा जाहिरातीमहापालिकेकडून केवळ नोटिसाच; दंड वसुलीकडे दुर्लक्ष २२२ रुपये प्रति चौरस फुट शुल्क जंगली महाराज रस्ता, नवी पेठ, कोरेगाव पार्क परिसरात नियमांचे उल्लंघन