डासोत्पतीच्या बांधकामांवर कारवाई
By Admin | Updated: July 15, 2014 03:55 IST2014-07-15T03:55:59+5:302014-07-15T03:55:59+5:30
शहरात डेंगी, मलेरियाने थैमान घातल्याने हैराण झालेल्या पुणे महापालिकेने डेंगी निर्मूलनासाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे.

डासोत्पतीच्या बांधकामांवर कारवाई
पुणे : शहरात डेंगी, मलेरियाने थैमान घातल्याने हैराण झालेल्या पुणे महापालिकेने डेंगी निर्मूलनासाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे. त्याअंतर्गत केलेल्या सर्वेक्षणात धनकवडी, कोथरूड, भवानी पेठ, विश्रामबाग, औंध, नगर रस्ता या क्षेत्रीय कार्यालयाच्या अंतर्गत येणाऱ्या भागांमध्ये डासांची मोठी प्रमाणात उत्पत्ती होत असल्याचे दिसून आले आहे. बांधकाम सुरू असलेल्या २२९ ठिकाणी डासांची पैदास होत असल्याच्या कारणांवरून त्यांच्या मालकांना नोटिसा देऊन त्यांच्यावर कारवाईही करण्यात आली आहे.
विशेष मोहिमेअंतर्गत १ ते ७ जुलै या काळात केलेल्या तपासणीत ही आकडेवारी समोर आली आहे. या काळात शहरात १ हजार ४५८ डासांची उत्पत्तिस्थाने आढळून आली. त्यापैकी १२३० ठिकाणी औषध फवारणी करून डासांची उत्पत्तिस्थाने नष्ट करण्यात आली, तर डेंगीचे डास आढळलेल्या २२९ बांधकामांना नोटिसा देऊन त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.
याबाबत पालिकेच्या कीटक प्रतिबंधक विभागाच्या प्रमुख डॉ. वैशाली जाधव म्हणाल्या, डासांची उत्पत्तिस्थाने शोधण्याच्या मोहिमेमध्ये धनकवडी क्षेत्रीय कार्यालयाच्या कार्यक्षेत्रामध्ये सर्वाधिक २९० ठिकाणी डासांची उत्पत्तिस्थाने आढळली आहेत. त्यापाठोपाठ भवानी पेठ, टिळक रोड येथे प्रत्येकी १७० ठिकाणे, औंध येथे ११६, विश्रामबाग येथे १२८ ठिकाणी डेंगीच्या डासांची उत्पत्ती होत असल्याचे आढळून आले आहे.
सर्वेक्षणात सुमारे तीन लाख घरांना भेटी देण्यात आल्या. डासोत्पत्ती होत असलेल्या ठिकाणी औषध फवारणी, धूर फवारणीसारख्या उपाययोजना केल्या आहेत. शहरातील ३१० रुग्णालयांमधून डेंगीच्या पेशंटची माहिती पालिकेला कळविण्यात येते, असेही त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)