जिल्ह्यात आतापर्यंत ३५ बोगस डॉक्टरांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:09 IST2021-06-26T04:09:21+5:302021-06-26T04:09:21+5:30
(स्टारव ८४९ डमी) पुणे : आयुर्वेद, होमिओपॅथी, ॲलोपॅथी आणि दंतचिकित्सा या चारपैकी एकही निकष पूर्ण केला नाही. अथवा कोणतेही ...

जिल्ह्यात आतापर्यंत ३५ बोगस डॉक्टरांवर कारवाई
(स्टारव ८४९ डमी)
पुणे : आयुर्वेद, होमिओपॅथी, ॲलोपॅथी आणि दंतचिकित्सा या चारपैकी एकही निकष पूर्ण केला नाही. अथवा कोणतेही प्रमाणपत्र नसतानाही रुग्णांवर बेकायदेशीर उपचार करणाऱ्या बोगस डॉक्टरांवर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने कठोर कारवाई केली आहे. आतापर्यंत एकूण ३५ बोगस डॉक्टरांवर कारवाई करण्यात आली असून, चालू वर्षात एका डॉक्टरला गजाआड केले आहे. तर शिरूर तालुक्यातील शिक्रापूर येथील एका बनावट हॉस्पिटलवर कारवाई केली आहे.
जिल्ह्यात मागील काही वर्षांत बोगस डॉक्टरकी करणाऱ्यांची संख्या वाढली होती. अनेक नागरिकांनी तालुका आरोग्य अधिकाऱ्यांकडे याबाबत तक्रारी दिल्या होत्या. त्या तक्रारींची जिल्हा पातळीवरुन दखल घेण्यात आली होती. त्यामुळे आतापर्यंत एकूण ३५ बोगस डॉक्टरांवर कारवाई करण्यात आली. त्यामुळे बोगसगिरी करणाऱ्यांना चांगलाच चाप बसला आहे. यंदा वर्षभरात एका बोगस डॉक्टरवर कारवाई केली आहे.
------
पॉईंटर्स
* जिल्ह्यात आतापर्यंत बोगस डॉक्टरांवर कारवाई :- ३५
* जिल्ह्यात आतापर्यंत विनापरवाना रुग्णालयांवर कारवाई :- १
------
तक्रार आली तरच कारवाई
आरोग्य विभागाला अशा बोगस डॉक्टरांविषयी थेट माहिती मिळत नाही. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांनी तालुका आरोग्य अधिकाऱ्याकडे अशा बोगस डॉक्टरांची माहिती दिल्यास त्याची तातडीने जिल्हा पातळीवरून दखल घेतली जात आहे. तसेच कारवाई करण्यात येत असल्याचे आरोग्य विभागाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत आष्टीकर यांनी सांगितले.
------
सर्वसामान्यांच्या जीवाशी खेळ
* आर्थिक साम्राज्य निर्माण करतात
प्रभावी वक्तृत्वशैली, सोशल मीडियाचा वापर प्रसार तसेच तोडपाणी करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांचा वापर करून या बोगस डॉक्टरांनी आर्थिक साम्राज्य निर्माण केले होते. त्यातून जिल्ह्यातील काही तालुक्यात अक्षरशः उच्छाद या बोगस डॉक्टरांनी मांडला होता. त्याबाबत अनेकांनी जागरूकपणे तक्रार केल्याने त्यांच्यावर कारवाई झाली आहे.
--
* इंटरनेटवरून दुकानदारी
कारवाई केलेल्या काही बोगस डॉक्टर इंटरनेटवर बनावट वैद्यकीय प्रमाणपत्र टाकून लोकांना औषध उपचार सांगत असल्याच्या तक्रारी आल्या होत्या. त्यांनी सांगितलेल्या औषध उपचारामुळे अनेकांना त्याचा त्रास झाला आहे. त्याबाबतही अनेक तक्रारी आल्या होत्या.
--
* निसर्गोपचाराच्या नावाने करतात उपचार
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने कारवाई केलेल्या काही बोगस डॉक्टरांनी निसर्गोपचाराच्या नावाखाली अनेक रुग्णांची आर्थिक पिळवणूक केली असल्याचे समोर आले आहे. अशा डॉक्टरांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचे वैद्यकीय प्रमाणपत्र नसताना उपचार करत असल्याचे निदर्शनास आले होते.