औद्योगिक क्षेत्राला ग्रहण; कामगार देशोधडीला

By Admin | Updated: August 12, 2014 03:54 IST2014-08-12T03:54:31+5:302014-08-12T03:54:31+5:30

लाखो कामगारांच्या हाताला काम देणाऱ्या कंपन्या, उद्योगांना कधी जागतिक आर्थिक मंदीची झळ सोसावी लागली, तर कधी करांच्या बोजाने हैराण व्हावे लागले.

Acquisition of industrial area; Workers can not wait | औद्योगिक क्षेत्राला ग्रहण; कामगार देशोधडीला

औद्योगिक क्षेत्राला ग्रहण; कामगार देशोधडीला

संजय माने, पिंपरी
लाखो कामगारांच्या हाताला काम देणाऱ्या कंपन्या, उद्योगांना कधी जागतिक आर्थिक मंदीची झळ सोसावी लागली, तर कधी करांच्या बोजाने हैराण व्हावे लागले. सवलत मिळेल, तिकडे कंपन्यांनी स्थलांतर करणे पसंत केले. डबघाईला आलेल्या कंपन्या बंद पडल्या. औद्योगिक क्षेत्राला ग्रहण लागले. पोटाची खळगी भरण्यासाठी, मोठ्या आशेने गाव सोडून या उद्योगनगरीत आलेले कामगार देशोधडीला लागले. या शहरात मोजक्या लोकांचे संसार फुलले, भवितव्य घडले. त्यापेक्षा कितीतरी पटीने अधिक कामगारांच्या वाट्याला पिळवणूक, अन्याय, संघर्षमय जीवन आले. स्वेच्छा निवृत्तीच्या गोंडस नावाखाली कामगार कपात झाली. वाढती महागाई, हाताला काम नाही, अशा परिस्थितीत कामगारांनी गाठोडे बांधून उद्योगनगरीकडे पाठ फिरवून गावचा रस्ता धरणे पसंत केले आहे.

देशाच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या व्यक्तीच्या हाताला काम मिळणार, अशी परिस्थिती असलेल्या शहरात सुमारे एक लाख लोक बेरोजगार झाले आहेत. पूर्वी मोठ्या कंपन्यांमध्ये किमान सहा महिन्यांच्या कालावधीकरिता हंगामी स्वरूपात काम मिळायचे. आता परिस्थिती उलटली आहे. काम मिळत नाही, म्हणून शहर सोडून जाणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. बेरोजगारीच्या प्रमाणातही दिवसेंदिवस वाढ होत आहे.
छोट्या-मोठ्या सुमारे ६ हजार उद्योगधंद्यांमुळे पिंपरी-चिंचवडचे औद्योगिकनगरीत रूपांतर झाले होते. राज्याच्याच नव्हे, तर देशाच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या कामगारांच्या हाताला काम मिळत होते. आता मात्र परिस्थिती बदलली असून, रोजगाराची संधी म्हणून विविध भागातून येणारे कामगारांचे लोंढे थांबले असून, हाताला काम नाही, अशा परिस्थितीत शहरात दिवस कंठणे कठीण जाऊ लागल्याने कामगारांनी गावचा रस्ता धरला आहे.
केंद्र शासनाचा अंगीकृत व्यवसाय असलेला हिंदुस्थान अ‍ँन्टिबायोटिक्स कारखाना १९५४ मध्ये पिंपरीत सुरू झाला. या कारखान्याने औद्योगिकीकरणाची मुहूर्तमेढ रोवली. पाठोपाठ बजाज आॅटो, टेल्को या वाहन उद्योगांसह त्यास पूरक उत्पादन करणारे कारखाने उभारले गेले. गरवारे, फिलिप्स, फिनोलेक्स, थरमॅक्स, केएसबी या कंपन्या दाखल झाल्या. सॅण्डविक एशिया, फोर्ब्स मार्शल, अल्फा लवाल या परदेशी कंपन्याही दाखल झाल्याने उद्योगवाढीस अधिक चालना मिळाली. अलीकडच्या काळात आयटी क्षेत्राचा विस्तार झाला. कारखान्यांमुळे गावाचे महानगरात रूपांतर झालेल्या या शहराचा कायापालट झाला. पायाभूत सुविधांचा दर्जा वाढला.
ज्या उद्योग-धंद्यांवर या शहराच्या विकासाचा डोलारा अवलंबून होता. त्या औद्योगिक क्षेत्राला ग्रहण लागले आहे. मोठ्या उद्योगांवर अवलंबून असणारे त्यांना पूरक उत्पादन देणारे सुमारे अडिच हजारांहून अधिक उद्योग या परिसरात होते. प्रेसिंग, ग्रार्इंडिंग, वेल्डिंग, ड्रिलिंग अशी काम करणाऱ्या छोट्या वर्क्सशॉपमध्येही अकुशल कामगारांनासुद्धा रोजगार मिळत होता.
आयटीआय अथवा अन्य तंत्र शिक्षण संस्थांमधून प्रशिक्षण घेऊन बाहेर पडणारे अनेक तरूण रोजगाराच्या शोधात उद्योगनगरीत यायचे. त्यांना कामही मिळत असे. हंगामी स्वरूपात सहा महिन्याच्या कालावधीसाठी मोठ्या कंपनीत काम मिळाल्यानंतर एका कंपनीत सहरा महिन्यांनी ब्रेक दिल्यानंतर दुसऱ्या कंपनीत सहा महिने काम करायचे. सहा- सहा महिन्याचा कालावधी अशा पद्धतीने औद्योगिक क्षेत्रात कोठे ना कोठे काम करत १२ ते १५ वर्षे या शहरात तग धरून राहिलेल्या लाखो कामगारांवर बेकारीची वेळ आली आहे.

Web Title: Acquisition of industrial area; Workers can not wait

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.