हगणदरीमुक्ती पुरस्कारापुरती..?

By Admin | Updated: November 2, 2016 06:40 IST2016-11-02T01:04:00+5:302016-11-02T06:40:30+5:30

राज्य शासनाच्या वतीने हगणदरीमुक्त नगरपालिका म्हणून पुणे जिल्ह्यातील ८ नगर परिषदांचा नुकताच गौरव झाला

Achievement of Smile Award? | हगणदरीमुक्ती पुरस्कारापुरती..?

हगणदरीमुक्ती पुरस्कारापुरती..?


पुणे : राज्य शासनाच्या वतीने हगणदरीमुक्त नगरपालिका म्हणून पुणे जिल्ह्यातील ८ नगर परिषदांचा नुकताच गौरव झाला खरा, परंतु पुरस्काराचे कवित्व संपते न संपते तोच पुन्हा एकदा पहिले पाढे पंचावन्न सुरू झाल्याचे बहुतांश नगरपालिका कार्यक्षेत्रातील चित्र आहे.
लोकमत टीमने केलेल्या पाहणीमुळे ह्यपुरस्कारापुरती हगणदरीमुक्तीह्ण ही वस्तुस्थिती काही ठिकाणी समोर आली आहे. तर, काही ठिकाणी हगणदरीमुक्ती टिकवून ठेवण्याचे आव्हान मोठे असल्याचे प्रशासनच कबूल करीत आहे.
बारामतीमध्ये सार्वजनिक स्वच्छतेच्या कामात सातत्य राखण्यासाठी जनजागृती केली जात असल्याचे चित्र आहे. मात्र, त्यासाठी नागरिकांची मानसिकता बदलण्याची गरज आहे. यापूर्वी ११८ लाभार्थ्यांना वैयक्तिक स्वच्छतागृहांचे अनुदान उपलब्ध करून दिले. ‘हगणदरीमुक्त बारामती’मध्ये सार्वजनिक मुताऱ्यांची मोठ्या प्रमाणात आवश्यकता आहे, असे आज ‘लोकमत’च्या पाहणीत आढळून आले. याच अनुषंगाने ज्या मुताऱ्यांची उभारणी केली आहे, तेथे दैनंदिन स्वच्छता नसल्याने पटांगणातच नैसर्गिक विधी करतात, असे चित्र आहे. अगदी नगरपालिकेसमोरील शारदा प्रांगणात महिला आणि पुरुषांसाठी उभारण्यात आलेल्या मुताऱ्यांमध्ये जाणेदेखील मुश्कील आहे. महिलांसाठी तर सार्वजनिक मुताऱ्याच नसल्याचे चित्र आहे. नगरपालिकेने अनेक सार्वजनिक व्यापारी संकुल बांधली; परंतु त्यामध्ये मुताऱ्या, स्वच्छतागृहे बांधली नाहीत. त्यामुळे व्यापाऱ्यांसह ग्राहकांची कुचंबणा होते. हे चित्र बारामतीतील पाहणीत समोर आले आहे.
‘बकाल’ व ‘गंदापूर’ अशा तिरस्करणीय संज्ञांनी हेटाळणी केली जाते, असे आधीचे इंदापूर परत दुर्दैवाने दृष्टीस पडत आहे. माजी नगराध्यक्ष अशोक इजगुडे, उपनगराध्यक्ष भरतशेठ शहा यांनी इंदापूर नगर परिषद हगणदरीमुक्त करण्याचा निर्धार करूनच मागील काळात संपूर्ण शहराचे सर्वेक्षण केले. त्यांच्या प्रयत्नांतून इंदापूरमध्ये अशक्य वाटणारी हगणदरीमुक्ती प्रत्यक्षात आली, मात्र प्रयत्नांचा हा वेग व दिशा कायम न राखली गेल्याने आता पुरस्कारानंतर पुन्हा एकदा ‘जैसे थे’ स्थिती येऊ लागल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या पाहणीत दिसून आले आहे.
राजगुरुनगर हगणदारीमुक्त तर झाले, पण गावात पुरेशा सार्वजनिक मुताऱ्या नसल्याने अनेक ठिकाणी उघड्यावर लघवी करणाऱ्यांची संख्या गावात मोठ्या प्रमाणात आढळते. त्यातही बाहेरगावातून बाजारासाठी, खरेदीसाठी, दवाखान्यासाठी, शासकीय कामासाठी किंवा अन्य कामांसाठी येणाऱ्या महिलांची फारच कुचंबणा होत आहे. जुन्नर शहरात प्रमुख बाजारपेठेत धान्यबाजारात नगरपालिकेच्या मालकीच्या व्यापारी संकुलात शौचालये आहेत. परंतु पाण्याअभावी त्याचा वापर होत नाही. नगरपालिकेच्या प्राथमिक शाळातील शौचालयाच्या बाबतीत तसेच पाणीपुरवठा विभाग या ठिकाणच्या समस्येबाबत नगरपालिका प्रशासनाने गांभीर्याने पाहण्याची गरज आहे.
आळंदीत मोहीम यशस्वी झाली असली, तरी या यशात सातत्य राखण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे. काही दिवसांवर आलेल्या कार्तिक यात्रेत शहर हगणदरीमुक्त ठेवण्यात प्रशासनाची मोठी कसोटी लागणार आहे. गोपाळपुरा येथील स्वच्छतागृहाचा पहिला मजला बंद असून, त्याचा वापर येथील रहिवाशांना करता येत नाहीय. तसेच महिला स्वच्छतागृहाच्या बाजूला मोठ्या प्रमाणात झाडेझुडपे वाढली आहेत. आषाढी वारीच्या वेळी शहरात ठेवण्यात आलेली तात्पुरती फिरती स्वच्छतागृहे तुंबलेली असून, त्यात दुर्गंधी पसरली आहे. काहींची दारे तुटलेली असून, त्याचा वापर करता येत नसल्याचे दिसून येते.
सासवड शहरात प्रवेश करताना प्रत्येक रस्त्याच्या कडेला मोकळ्या जागेत झोपड्या उभ्या राहात व हे लोक उघड्यावर शौचालयाला जात. याशिवाय झोपडपट्टीतील लोकही उघड्यावर जात. अनेक वर्षे लागलेली सवय मोडणे फारच अवघड होते. नगर परिषद अधिकारी, कर्मचारी, नगरसेवक, पदाधिकारी यांनी गाव हगणदरीमुक्त केले, तरीही आता पुन्हा ते तसेच टिकवून ठेवण्याचे मोठे आव्हान आहे.
>‘लोकमत’ने शिरूर शहरातील विविध भागांत पाहणी केली असता, तेथे स्वच्छता आढळून आली. ग्रामीण रुग्णालयासमोरून बाजार समितीकडे जाणाऱ्या रस्त्यावर न्यू इंग्लिश स्कूलच्या मैदानाच्या संरक्षक भिंतीलगत नागरिक उघड्यावर बसायचे. या ठिकाणी आता नागरिक बसत नाहीत. शौचालयाचा वापर करतात. तेथे कोणी बसू नये म्हणून छोटेसे कंपाउंड करून झाडे लावण्यात आली आहेत. दशक्रिया घाटाकडे जाणाऱ्या रस्त्यावरही नागरिक उघड्यावर बसायचे. तेथेही आता असे प्रकार बंद झाल्याचे दिसून आले.
>दौंड शहरात प्रत्यक्षात परिस्थिती पाहिली, तर शहरालगत असलेला नदीकाठचा भाग पाहिजे त्या प्रमाणात हगणदरीमुक्त झालेला नाही. बहुतांश लोक स्वच्छतागृहांचा वापर न करता नदीकाठी उघड्यावर शौचाला जातात. त्यामुळे नगर परिषदेने हगणदरीमुक्तीचा केलेला दावा फोल ठरला आहे. नदीकाठचा परिसर पूर्णपणे हगणदरीमुक्त कसा होईल, याकडे नगर परिषदेने लक्ष
दिले पाहिजे. खाटिक गल्ली आणि बाजारतळावरील गाववेशीजवळ अद्ययावत स्वच्छतागृह बांधण्यात आलेली आहेत. परंतु, या परिसरातील लोकसंख्येच्या तुलनेत ही स्वच्छतागृहे अपुरी पडतात.

Web Title: Achievement of Smile Award?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.