आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला

By Admin | Updated: February 23, 2017 02:51 IST2017-02-23T02:51:27+5:302017-02-23T02:51:27+5:30

यंदाची पंचवार्षिक निवडणूक भोसरी मतदारसंघासाठी अत्यंत अटीतटीची

Achieve the prestige of the former MLAs | आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला

आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला

भोसरी : यंदाची पंचवार्षिक निवडणूक भोसरी मतदारसंघासाठी अत्यंत अटीतटीची आणि प्रतिष्ठेची ठरणार हे निश्चित आहे. एका बाजूला राष्ट्रवादीचा हा बालेकिल्ला ताब्यात घेण्यासाठी भाजपचे आमदार महेश लांडगे यांनी आपली ताकत पणाला लावली आहे, तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे माजी आमदार विलास लांडे यांनी आपल्या हक्काचा गड राखण्यासाठी आपली प्रतिष्ठा पणाला
लावली आहे. त्यामुळे निकालाबाबत धाकधूक, अस्वस्थता आणि उत्कंठा  असे संमिश्र वातावरण  सध्या भोसरीमध्ये पाहायला मिळत आहे.

माजी आमदार लांडे व आमदार लांडगे या दोघांसाठी शहराबरोबरच भोसरीत सत्ता राखणे गरजेचे आहे. लांडगे हे भोसरी गावठाणातील तर लांडे हे लांडेवाडीतील रहिवासी असून हा भाग प्रभाग क्रमांक ७ शी संलग्न आहे. आमदार लांडगे यांचे बंधू सचिन लांडगे हे प्रभाग क्रमांक ५ मधून राष्ट्रवादीचे अजित गव्हाणे यांच्याविरुद्ध निवडणूक लढवत आहेत. तर माजी आमदार लांडे यांचे चिरंजीव विक्रांत लांडे हे प्रभाग ८ इंद्रायणीनगर मधून निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे या भागातही आजी माजी आमदारांची ही वर्चस्वाची लढाई रंगतदार ठरणार असल्याची चिन्हे दिसत आहेत.
निवडणुकीपूर्वी आमदार महेश लांडगे यांनी व्हिजन २०२० च्या माध्यमातून विकासाची संकल्पना मांडून शहराचा कायापालट करून दाखवण्याचा केलेल्या निर्धारादरम्यान राष्ट्रवादीच्या अनेक नगरसेवकांनी व पदाधिकाऱ्यांनी भाजप लाटेवर स्वार होत भाजपाच्या गोटात सामील होणे पत्करले. याशिवाय राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या शहरात घर घर लागली याच मुद्द्याचा फायदा घेत भाजपने राष्ट्रवादीचे शिलेदार माजी महापौर आझम पानसरे यांना आपल्या गोटात ओढून राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्याला भगदाड पाडण्याचा प्रयत्नही केला. त्यातच राष्ट्रवादीवरील महापालिकेत भ्रष्टाचाराचे आरोप आणि पंतप्रधान मोदींची नोटबंदीचा निर्णय यामुळे जनमत काहीअंशी भाजपच्या बाजूने झुकले गेल्याचे दिसून येत होते. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांत आलेली मरगळ आणि विरोधकांच्या आरोप प्रत्यारोपांना तोंड देत राष्ट्रवादीने माजी आमदार विलास लांडे यांच्या खांद्यावर निवडणुकीची धुरा सोपवली.
शहराचा विकास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून झाल्याच्या मुद्द्यावर भर देत राष्ट्रवादीने शेवटपर्यंत प्रचारयंत्रणा राबवली. त्यातच निवडणुकीपूर्वी विरोधकांनी केलेले भ्रष्टाचाराचे आरोपही सिद्ध करू न शकल्याने ते आरोपही राष्ट्रवादीच्या पथ्यावर पडल्याचे दिसून आले.
निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात आमदार महेश लांडगे यांनी व्हिजनचा मुद्दा काहीसा नजरेआड केला तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या लोकप्रियतेवर प्रचारयंत्रणा राबवण्याचे तंत्र अवलंबले. नेमके चित्र निकालानंतरच स्पष्ट होणार आहे. (वार्ताहर)

मतदानाचा वाढलेला टक्का कुणाच्या पथ्यावर?
४आतापर्यंतच्या पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीतील सर्वाधिक ६७ टक्के मतदान या वेळी झाल्याने अधिक स्पष्टतेने नगरसेवक निवडीची प्रक्रिया अमलात येणार असल्याचे दिसून येते. मतदानाची वाढलेली टक्केवारी दिलासादायक असली तरी हे वाढलेले मतदान नक्की कोणत्या राजकीय पक्षाच्या पथ्यावर पडणार, याचा फायदा नक्की कुणाला, सत्तेची समीकरणे या वाढलेल्या टक्केवारीने बदलणार का, असे अनेक प्रश्न निकालापर्यंत अनुत्तरीतच राहतील. तरुण पिढीचा वाढलेला प्रतिसाद, नवीन मतदारांचा उत्साह आणि डोळसपणे समाजाकडे पाहण्याची वाढीस लागलेली वृत्ती यामुळे लोकशाहीतील मतदानाच्या हक्काची ताका सर्वसामान्यांना आता कळू लागली आहे अशी चर्चा सर्वत्र आहे.


माजी उपमुख्यमंत्र्यांच्या नऊ जाहीरसभा

४माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या एकाच दिवसातील ९ ठिकाणच्या जाहीर सभांनी कार्यकर्त्यांसाठी संजीवनीचे काम केले. त्यातच माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार व धनंजय मुंडे यांची भोसरी येथील जाहीर सभा व त्या सभेतून शरद पवार यांनी भाजपा सरकारवर केलेली टीका, तसेच राष्ट्रवादीचा विकासाचा अजेंडा स्पष्ट केल्याने बॅकफूटवर गेलेली राष्ट्रवादी ऐन निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा सक्रिय झाल्याचे स्पष्ट झाले. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार व आमदार विलास लांडेंच्या विकासाच्या मुद्द््यावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहरातील सत्ता पुन्हा राखणार की मोदी लाट आणि आमदार महेश लांडगे यांच्या व्हिजनच्या बळावर राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यावर भाजपा आपला झेंडा फडकावणार मतपेटीतून स्पष्ट होईल.


शिवसेना ठरणार किंगमेकर?
४२०१२ मध्ये महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीला ८३ जागांसह एकतर्फी बहुमत मिळाले होते. पण या वेळी या जागा घटण्याची शक्यता आहे. यावेळी राष्ट्रवादीला सत्ता स्थापन करण्यासाठी इतर पक्षांची मदत घ्यावी लागण्याची चिन्हे दिसत आहेत. तशीच काहीशी स्थिती भाजपाबाबत होण्याचीही शक्यता आहे. त्यामुळे शिवसेनेची भूमिका किंगमेकरची ठरणार का, हा प्रश्न निर्माण होत आहे. शहरात शिवसेना राष्ट्रवादीला पाठिंबा देण्याची शक्यता जाणकारांकडून वर्तवली जात आहे. सत्तेसाठी अपक्ष आणि काँग्रेसच्या नगरसेवकांचीही भूमिका महत्त्वाची ठरणार असल्याचेही दिसून येते.

Web Title: Achieve the prestige of the former MLAs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.