पुणे : मित्रावर जीवघेणा हल्ला केल्याप्रकरणातील अटक केलेल्या आरोपीला उपचारासाठी रुग्णालयात नेले असताना त्याने खिडकीतून उडी मारुन पलायन केले़ ही घटना कमल नयन रुग्णालयात रविवारी रात्री साडेदहाच्या सुमारास घडली़ याप्रकरणी खडक पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे़ अनुराग कमलेश भाटीया (वय २३, रा़ पाषाण सुस रोड) असे त्याचे नाव आहे. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक उमाजी राठोड यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनुराग भाटीया याने त्याच्या मित्रावर कोयत्याने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता. याप्रकरणी खडक पोलिसांनी त्याला अटक केली होती. त्याला न्यायालयाने पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले होते. पोलीस कोठडीत असताना त्याला रविवारी जुलाब व उलट्यांचा त्रास होत होता. त्यावेळी सहायक पोलीस निरीक्षक उमाजी राठोड व पोलीस नाईक सातपुते हे दोघे त्याला शिवाजी रस्त्यावरील कमलनयन रुग्णालयात घेऊन गेले. तेथे डॉक्टरांनी त्याची तपासणी केली. त्याचे प्रिस्क्रीप्शन लिहून दिल्यानंतर औषधे आणण्यासाठी सातपुते गेले होते. त्यावेळी त्याने पुन्हा त्रास होत असल्याचे उमाजी राठोड यांना सांगितल्याने त्यांनी त्याला रुग्णालयातील शौचालयात नेले. मात्र, त्याने शौचालयातील उघड्या खिडकीवाटे पलायन केले. पोलिस त्याचा शोध घेत आहेत. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक व्ही. एस. पवार करत आहेत. ................
मित्रावर जीवघेणा हल्ला करणाऱ्या आरोपीचे रुग्णालयातून पलायन
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2018 16:01 IST
अनुराग भाटीया याने त्याच्या मित्रावर कोयत्याने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता. याप्रकरणी खडक पोलिसांनी त्याला अटक केली होती.
मित्रावर जीवघेणा हल्ला करणाऱ्या आरोपीचे रुग्णालयातून पलायन
ठळक मुद्देशौचालयातील उघड्या खिडकीवाटे पलायन