पिस्तुलासह आरोपी गजाआड
By Admin | Updated: January 28, 2017 01:52 IST2017-01-28T01:52:22+5:302017-01-28T01:52:22+5:30
पूर्ववैमनस्यातून एकाला ठार मारण्यासाठी आणलेल्या पिस्तुलासह गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पथकाने एकाला अटक केली आहे.

पिस्तुलासह आरोपी गजाआड
पुणे : पूर्ववैमनस्यातून एकाला ठार मारण्यासाठी आणलेल्या पिस्तुलासह गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पथकाने एकाला अटक केली आहे. त्याच्याकडून एक गावठी पिस्तूल व ४ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आल्याची माहिती उपायुक्त पी. आर. पाटील यांनी दिली.
उमेश बाळासाहेब काळभोर (वय ३५, रा. धायरीगाव ) असे युनिट एकने पिस्तुलासह अटक केलेल्याचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विश्रामबाग परिसरात एक जण पिस्तुलासह येणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन भोसले-पाटील व सहायक फौजदार संभाजी भोईटे यांना मिळाली होती. त्यांनी सहायक निरीक्षक धनंजय कापरे, पोलीस उपनिरीक्षक दिनेश पाटील, सहायक फौजदार शशिकांत शिंदे, रवींद्र कदम, संभाजी भोईटे, पोलीस हवालदार रिजवान जिनेडी, प्रकाश लोखंडे, मेहबूब मोकाशी, उमेश काटे, श्रीकांत वाघवले, इरफान मोमीन, तुषार खडके, सुधाकर माने, सुभाष पिंगळे, अशोक माने, प्रशांत गायकवाड, मोहन येलपले यांच्यासह सापळा लावला.
काळभोर याला ताब्यात घेऊन अंगझडती घेण्यात आली. त्यांच्या कंबरेला एक गावठी पिस्तूल व चार काडतुसे मिळाली. त्याच्याविरोधात खून व शरीराविरुद्धचे गुन्हे दाखल असून तो नुकताच येरवडा कारागृहात शिक्षा भोगून बाहेर आला आहे. काळभोर हा महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा सक्रिय झाल्याचेही पोलिसांना समजले होते. ही कारवाई गुन्हे शाखेचे उपायुक्त पी. आर. पाटील, सहायक आयुक्त सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.