पुणे : चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून करणाऱ्याला वैद्यकीय तपासणीनंतर पुन्हा फरासखाना लॉकअपमध्ये घेऊन जात असताना शनिवारी दुपारी पोलिसांच्या तावडीतून पळून गेलेल्या राहुल हंडाळ याला गुन्हे शाखेच्या युनिट 1ने पहाटे पावणे दोनच्या सुमारास कोंढवा धावडे परिसरात पकडण्यात आले.राहुल ऊर्फ ऋषिकेश राजेश हंडाळ (वय २२, रा. अंकुश पॅलेस, कुटे मळा, मानाजीनगर, न-हे गाव)असे त्याचे नाव आहे. चारित्र्याच्या संशयावरून त्याने आपली पत्नी कोमल हिचा २६ एप्रिल रोजी पहाटे गळा आवळून व फाशी देऊन खून केला होता. त्याला पोलिसांनी २६ एप्रिलला सायंकाळी अटक केली होती. त्याला २७ एप्रिलला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला १ मेपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली होती.त्याची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी सिंहगड रोड पोलीस ठाण्यातील सहायक फौजदार संजय सोनवणे, हे काॅन्स्टेबल डी. एस. ठोंबर यांनी शनिवारी २८ एप्रिलला सकाळी पावणे बारा वाजता फरासखाना लॉकअपमधून घेऊन ससून रुग्णालयात नेले. तेथून ते पुन्हा फरासखाना लॉकअपमध्ये ठेवण्यासाठी घेऊन जात असताना अप्पा बळवंत चौकात सोनवणे यांना धक्का देऊन तो पळून गेला होता.गुन्हे शाखा युनिट १ चे पोलीस उपनिरीक्षक दिनेश पाटील, हर्षल यादव, हेडकाँस्टेबल रिझयान जेनडी, अशोक माने, उमेश काटे, पोलीस नाईक सचिन जाधव, प्रशांक गायकवाड व सिंहगड पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक विश्वजीत जगताप, उपनिरीक्षक गिरीश सोनवणे, हेडकाँस्टेबल सुनील पवार, सहायक फौजदार संजय सोनवणे, डी. एस. ठोंबरे हे शहरात विविध ठिकाणी त्याचा शोध घेत होते. यावेळी पहाटे पावणे दोन वाजता तो कोंढवे धावडे येथे फिरत असताना पोलिसांना दिसून आला. पोलिसांना पाहून तो पळून जाऊ लागला. पोलीसही त्याचा पाठलाग करीत असताना तो मोटारसायकलला धडकून खाली पडला. त्यात त्याच्या उजव्या हाताचे मनगट व पायाला मुक्का मार लागला. पोलिसांनी त्याला अटक केली असून उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल केले आहे.
चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून करणाऱ्या पोलिसांच्या तावडीतून पळालेल्या आरोपीस 12 तासांत अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2018 08:35 IST